सांगली : दारूच्या नशेत झालेल्या वादातून शैलेश कृष्णा राऊत (वय २६, मूळ रा. बेनीखुर्द, ता. लांजा, जि. रत्नागिरी, सध्या रा. सावंत प्लॉट) या हॉटेलमधील वेटरचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. सांगलीत सिव्हिल हॉस्पिटलच्या मागील बाजूस असलेल्या सावंत प्लॉटमध्ये हा प्रकार घडला. खूनप्रकरणी संशयित सुमित संतोष मद्रासी (वय २३, रा. इंदिरानगर झोपडपट्टी), सौरभ बाबासाहेब कांबळे (वय २२, रा. त्रिमूर्ती कॉलनी, सांगली) या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. तर अल्पवयीन युवकास ताब्यात घेतले.मृत शैलेश राऊत हा बेनीखुर्द (ता. लांजा) येथील आहे. तो सांगलीतील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता. संशयित सुमित मद्रासी, सौरभ कांबळे व अल्पवयीन युवकाशी त्याची चांगली ओळख होती. संशयित गुरुवारी एका हॉटेलमध्ये दारू पिण्यासाठी गेले होते. त्यानंतर ते पुन्हा सिव्हिल हॉस्पिटलच्या मागे असलेल्या मराठा सेवा संघाच्या सांस्कृतिक भवन शेजारील खुल्या जागेत आले. रात्री नऊच्या सुमारास शैलेश तेथे आला. पुन्हा चौघे जण दारू प्यायले. चौघेही नशेत होते.शैलेश याने आणखी दारू पाहिजे, अशी मागणी केली. संशयितांनी त्याला नकार दिला. त्यावरून वादावादी झाली. शैलेशने त्याच्याकडे असलेला चाकू काढून धमकावले. तेव्हा तिघांनी त्याला पकडून चाकू काढून घेतला. यावेळी धक्काबुक्की झाली. झटापटीत संशयितांनी शैलेशला भोसकले. शैलेशच्या छातीत आणि डाव्या पायाच्या मांडीवर वार झाला. तो रस्त्यावर जाऊन पडला. तेव्हा तिघांनी तेथून पळ काढला. छातीत वर्मी वार झालेल्या शैलेशचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी विश्रामबाग पोलिसांना माहिती दिली. पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे पथकासह दाखल झाले. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे हेदेखील पथकासह दाखल झाले. घटनास्थळी मृत शैलेशची चप्पल, दुचाकी मिळाली.पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांना सूचना दिल्या. गुन्हे अन्वेषणचे उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे पथक संशयितांच्या मागावर होते. त्यांच्या पथकातील सुमित सूर्यवंशी, विनायक सुतार यांना धामणी रस्ता ते उष:काल हॉस्पिटल रस्त्यावर तिघे थांबल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना ताब्यात घेतले. त्यांनी किरकोळ वादातून चाकूने भोसकून खून केल्याची कबुली दिली. मृत शैलेशचे मेव्हणे संग्राम चंद्रकांत चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.
किरकोळ वादातून जीवाला मुकलाशैलेश आणि संशयित चांगले ओळखीचे होते. दारू पिण्यावरून किरकोळ वाद झाला. शैलेशने स्वत:कडील चाकू काढून धमकावले. तेव्हा तिघांनी त्याचा चाकू काढून घेऊन त्याला भाेसकले. दोन वार वर्मी बसल्यानंतर शैलेश जागीच मृत झाला.
गर्भवती पत्नीला धक्कामृत शैलेश याचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. सांगलीत तो बापट मळ्याजवळ ओम फूडमध्ये कामास होता. पत्नीसह सावंत प्लॉट येथे राहत होता. पत्नी बाळंतपणासाठी गावी गेली होती. सध्या तो एकटाच राहत होता. शैलेशचा खून झाल्याची माहिती मेहुणे संग्राम चव्हाण यांनी कळवली. तेव्हा पत्नीला धक्का बसल्याचे सांगण्यात आले.