दरीबडची : माडग्याळ (ता. जत) येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत बनावट सोने गहाण ठेवून त्यावर १३ लाख २१ हजार रुपयांचे कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, यामध्ये बँकेच्या सोनारानेच फसवणूक करणाऱ्यांशी संगनमत केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी आठ जणांवर उमदी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विभागीय अधिकारी राजेंद्र तम्मा नाटेकर (रा. जत) यांनी शनिवार दि. ४ रोजी फिर्याद दिली.बँकेत श्रीकांत गोविंद हुवाळे, अंकुश रामू घोदे (रा. व्हसपेठ, ता. जत), दिलीप सुखदेव सावंत, मच्छिंद्र शाहू सावंत, बँकेचा सोनार संजय विठ्ठल सावंत (सर्व रा. माडग्याळ, ता. जत), शहाजी बापू तुराई, सिद्धू रतन शिंदे (रा. राजोबाचीवाडी, व्हसपेठ, ता. जत), दुंडाप्पा भीमराव गावडे (रा. सोरडी, ता. जत) या आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. संबंधितांनी ऑक्टोबर २०२१ ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत बँकेत सोने गहाण ठेवले. माडग्याळ येथे जिल्हा बँकेच्या शाखेत श्रीकांत हुवाळे, अंकुश घोदे, दिलीप सावंत, मच्छिंद्र सावंत, शहाजी तुराई, सिद्धू शिंदे, दुंडाप्पा गावडे यांनी सोने तारण कर्जासाठी अर्ज केला होता. यासाठी त्यांनी बँकेचा सोनार संजय सावंत याच्याशी संगनमत करून खोटे सोने खरे भासवले. त्याचा लेखी मूल्यांकन अहवाल बँकेच्या कर्जरोख्याच्या फॉरमॅटमध्ये सही-शिक्क्यानिशी प्रमाणीत केला. अशा पद्धतीने कर्जासाठी बनावट सोने बँकेत तारण गहाण ठेवले. या माध्यमातून सात जणांनी एकूण १३ लाख २१ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते.हा सर्व प्रकार ऑक्टोबर २०२१ ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत घडला होता. मात्र, दोन महिन्यांपूर्वी बँकेने तपासणीत सोने खोटे असल्याचे उघड झाल्याने थेट बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास हवालदार संजयकुमार माळी करीत आहेत. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.कुंपणाने शेत खाल्लेसोने गहाण तारणासाठी दागिन्यांचा खरेपणा व मूल्यांकन करण्यासाठी बँकेने अधिकृत सोनार संजय सावंत याची नेमणूक केली आहे. त्यांच्या मूल्यांकन व लेखी अहवालावर कर्ज दिले जाते. या कामासाठी कमिशन दिले जाते. त्यांनीच आठ जणांशी संगनमत करून बँकेला १३ लाख २१ हजार रुपयांचा गंडा घातला आहे.
Sangli Crime: बनावट सोने तारण ठेवले, अन् बँकेलाच तेरा लाखाला गंडवले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2023 3:58 PM