- हणमंत पाटील/प्रताप महाडिक कडेगाव - कडेगाव पोलिस ठाण्यात भावाविरुद्ध दिलेल्या तक्रार अर्जावरून गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यास लाच देताना उपाळे मायणी (ता. कडेगाव) येथील एकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. मंगळवारी (१२ डिसेंबर) रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली. अभिजित नारायण गोरड (वय ३६, रा. उपाळे-मायणी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी कडेगाव पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या एका अधिकाऱ्याने तक्रार दिली हाेती.
तक्रारदार हे कडेगाव पोलिस ठाण्यात अधिकारी आहेत. उपाळे मायणी येथील अभिजित गोरड यांनी कडेगाव पोलिस ठाण्यात त्यांच्या भावाविरुद्ध दिलेल्या तक्रार अर्जावरून गुन्हा दाखल करण्यासाठी अधिकाऱ्यास लाच घेण्याबाबत आग्रह केला. यावर संबंधित पोलिस अधिकाऱ्याने ८ डिसेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केली असता अभिजित गोरड याने तक्रारदार अधिकाऱ्यास ५००० रुपये लाच घेण्याचा आग्रह केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर मंगळवारी कडेगाव पाेलिस ठाण्यात सापळा लावण्यात आला. यावेळी अभिजित गोरड याला तक्रारदार अधिकाऱ्यास ५००० रुपये लाच देत असताना रंगेहात पकडण्यात आले. अभिजित गोरड याच्याविरुद्ध कडेगाव पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ८ अन्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू हाेती.
उपआयुक्त व पोलिस अधीक्षक अमोल तांबे, पोलिस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (पुणे) विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील, निरीक्षक विनायक भिलारे, अंमलदार सलिम मकानदार, चंद्रकांत जाधव, प्रीतम चौगुले, अजित पाटील, ऋषिकेश बडणीकर, चालक वंटमुरे यांनी ही कारवाई केली.