जत/माडग्याळ : व्हसपेठ (ता.जत) येथे शेतजमीन नावावर करून देण्यास नकार दिल्याने जन्मदात्या आईचा एकुलत्या एका मुलाने दगडाने ठेचून निर्घृण खून केला. ही घटना रविवारी दुपारी घडली. शांताबाई अण्णाप्पा कोरे (वय ५५) असे मृत महिलेचे नाव आहे. हल्लेखोर मुलगा सुरेश आण्णाप्पा कोरे (वय ३७) याला जत पोलिसांनी अटक केली आहे.माडग्याळ (ता.जत) येथून दोन किलोमीटर अंतरावर व्हसपेठ हद्दीमध्ये शांताबाई व सुरेश यांचे शेत आहे. सुरेश याच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. वडिलांच्या निधनानंतर शांताबाई व सुरेश दोघेच घरी राहात होते. त्यांच्या मालकीची ४० एकर शेतजमीन आहे.सुरेश आईसोबत शेतात काम करीत असते, तसेच त्याच्या मालकीचा एक ट्रॅक्टरही आहे. शेती व ट्रॅक्टरच्या व्यवसायावर दोघांचा उदरनिर्वाह सुरू होता. गेल्या काही दिवसांपासून त्याने आईकडे जमीन नावावर करून देण्यासाठी तगादा लावला होता. मात्र, या जमिनीपैकी काही जमीन तो विकणार असल्याचे समजल्याने, शांताबाई जमीन त्याच्या नावावर करण्यास तयार नव्हत्या. यामुळे सुरेश चिडून होता, अशी चर्चा आहे.रविवारी दुपारी सुरेश व शांताबाई यांच्यात पुन्हा वाद झाला. या वादामुळेच सुरेशने चिडून जाऊन जवळच पडलेला दगड उचलून शांताबाई यांच्या डोक्यात घातला. चेहऱ्यावर व डोक्यावर दगडाचे वर्मी घाव बसल्यामुळे शांताबाई यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच, माडग्याळ, व्हसपेठ परिसरात खळबळ उडाली. घटनेची नोंद जत पोलीस ठाण्यात झाली असून, अधिक तपास सुरू आहे.
पोलिसांमध्ये हद्दीचा वादमाडग्याळ गावापासून दोन किलोमीटर अंतरावर व्हसपेठ गावच्या हद्दीत खुनाची घटना घडली. हे ठिकाण उमदी व जत दोन्ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीवर येते. यामुळे दोन्ही ठिकाणची पोलीस पथके घटनास्थळी दाखल झाली. अखेर खून झालेले ठिकाण हे जत पोलिसांच्या हद्दीत येत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, जत पोलिसांनी प्राथमिक नोंद घेत तपासाला गती दिली. संशयित सुरेश कोरे याला ताब्यात घेतले.