घनशाम नवाथेसांगली : हरिपूर येथे मागील आठवड्यात बंद बंगला फोडला. मंगळवारी गव्हर्मेंट कॉलनीत बंद फ्लॅट फोडला. दोन्ही ठिकाणी चोरट्यांनी ठसेतज्ज्ञांना चकवण्यासाठी हातमोजे वापरले तसेच श्वानाला चकवण्यासाठी चोरीनंतर सर्वत्र पाणी ओतून ठेवले. चोरीनंतर मागमूस न ठेवण्याचा हा प्रकार प्रथमच पोलिस पाहत आहेत. त्यामुळे पोलिस यंत्रणा चक्रावली आहे. चोरट्यांच्या या गुन्हे करण्याच्या पद्धतीचा अर्थात ‘मोडस ऑपरेंडी’ चा पोलिस अभ्यास करत आहेत.मोठी घरफोडी, चोरी घडल्यानंतर पोलिसांकडून चोरट्यांचा माग काढण्यासाठी ठसेतज्ज्ञांना आणि श्वानपथकाला पाचारण केले जाते. चोरट्यांनी स्पर्श केलेल्या वस्तूंवरील बोटांचे ठसे घेतले जातात. त्यावरून पूर्वीच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या ठशांशी ते जुळविले जातात. ठशांवरून आजवर अनेक गुन्ह्यातील गुन्हेगार पकडले गेले आहेत. त्याचबरोबर गुन्हा घडल्यानंतर गुन्हेगार कोणत्या दिशेने पळून गेला याचा माग काढण्यासाठी श्वान मदत करते. श्वानांनी देखील आजवर अनेक गुन्हेगारांना पकडण्याच्या कामात मदत केली आहे.
चोरट्यांची गुन्हा करताना एक वेगळी पद्धत असते. त्यावरून पोलिस त्यांचा माग काढण्याचा प्रयत्न करतात. गुन्हेगारांची विशिष्ट पद्धत पाहून पोलिस तपासाला दिशा देण्याचा प्रयत्न करतात. परंतु सराईत आणि हुशार गुन्हेगार कधी-कधी कोणताही पुरावा न सोडता चकवा देण्याचा प्रयत्न करतात तेव्हा पोलिसांना वेगवेगळ्या मार्गाने तपास करावा लागतो. काही गुन्हेगारांना पोलिस तपासाची पद्धत माहिती असते. त्यामुळे आपले ठसे कुठे उमटणार नाहीत यासाठी हातमोजे वापरतात तसेच गुन्हा घडल्यानंतर श्वान पथकाला माग लागू नये म्हणून वेगवेगळ्या शक्कल लढविल्या जातात.हरिपूर येथे आठवड्यापूर्वी बंगला फोडल्यानंतर चोरट्यांनी तेथे सर्वत्र पाणी ओतून टाकले. त्यामुळे श्वानाला माग काढण्यात अडथळे आले. हाच प्रकार गव्हर्मेंट कॉलनीतील फ्लॅट फोडल्यानंतर दिसून आला. तेथेही श्वानाला माग काढण्यात अडथळा आला. त्यामुळे श्वानाला चकवणारी गुन्हेगारांची पद्धत पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे. चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांना कसून प्रयत्न करावे लागत आहेत.
सराईत गुन्हेगार असण्याची शक्यतापारधी समाजातील काही गुन्हेगार चोरीनंतर श्वान तत्काळ मागावर येऊ नये म्हणून वेगवेगळे प्रयोग करतात. आता बरेच गुन्हेगार दुचाकी, चारचाकीतून येऊन गुन्हे करतात आणि पळून जातात. त्यामुळे श्वान घुटमळते. हरिपूर आणि गव्हर्मेंट कॉलनीत असाच चोरीचा प्रकार घडला आहे. त्यामुळे चोरटे सराईत असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.