सांगली : शहरातील विजयनगर परिसरात १० कोटी रुपये खर्चून नवीन कृषी भवन उभारण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री डाॅ. विश्वजित कदम यांनी सांगितले. याचबरोबर महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी कृषी विभागाची अडीच एकर जागा उपलब्ध करून देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.
मुंबई मंत्रालयात कृषी मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आला आहे. डाॅ. कदम म्हणाले की, सांगली, मिरज आणि कुपवाड या तीन शहराची मिळून महापालिका स्थापन झाली. पण महापालिकेची प्रशासकीय इमारत अद्यापही नाही. त्यामुळे प्रशासकीय कामकाजासाठी अडचणी निर्माण होत होत्या, यासाठी जागेची आवश्यकता होती. कृषी मंत्री दादा भुसे यांनी कृषी विभागाच्या जागेसाठी सहमती दर्शविली. यामुळे महापालिका इमारत होण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे.
यापूर्वी माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या पुढाकाराने जिल्हा प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. महापालिका इमारतही याच परिसरात होत आहे. महापालिकेसोबतच नवीन कृषी भवनही उभारले जाणार आहे. जवळपास २५ ते ३० हजार चौरस फूट जागेत १० कोटी खर्चून महापालिकेच्या माध्यमातून हे भवन बांधले जाणार आहे.
महापालिकेच्या नूतन इमारतींबरोबर काम
महापालिका इमारत व कृषी भवन ही दोन्ही कामे समांतर पद्धतीने करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे कदम यांनी स्पष्ट केले. या बैठकीला आयुक्त नितीन कापडणीस यांच्यासह जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.