संतोष भिसेसांगली : कोल्हापुरातून मिरजेसाठी काढल्या जाणाऱ्या प्रस्तावित क्वाड लाइनमध्ये धामणी (ता. मिरज)जवळ नवे रेल्वे स्थानक उभारले जाण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने अंतिम सर्वेक्षणाचे आदेश मध्य रेल्वेने दिले आहेत. नवे स्थानक अस्तित्वात आल्यानंतर कोल्हापुरातून कर्नाटकात आणि सोलापूरकडे धावणाऱ्या गाड्या मिरज जंक्शनमध्ये जाणार नाहीत.कोल्हापुरातून बेळगाव आणि सोलापूरकडे जाणाऱ्या गाड्यांना मिरजेत इंजिन वळवून जोडावे लागते. यामध्ये सरासरी २० मिनिटे वेळेचा अपव्यय होतो. तो टाळण्यासाठी क्वाड लाइन टाकण्यात येणार आहे. त्याला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. नवा लोहमार्ग प्रत्यक्षात येण्यासाठी अंतिम सर्वेक्षणाचे आदेश मध्य रेल्वेने नुकतेच दिले आहेत. १० किलोमीटर लांबीचा हा पर्यायी मार्ग अंकली-धामणीदरम्यान सुरू होऊन, मिरजेत म्हैसाळ रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलाजवळ सध्याच्या लोहमार्गाला जोडला जाईल. यानिमित्ताने अंकली-धामणी जंक्शन स्थानक होईल. येथे स्थानकाची सुसज्ज इमारत, कर्मचारी निवासस्थाने, आदींची उभारणी होईल.प्रशासकीय विभागाने सर्वेक्षणाच्या खर्चाला यापूर्वीच अंतिम मंजुरी दिली आहे. आता अंतिम सर्वेक्षणासाठी निविदा काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या गतिशक्ती योजनेतून हे काम होणार आहे.काय आहे क्वाड लाइन?क्वाड लाइन म्हणजे मिरज स्थानकाला बायपास करणारा पर्यायी लोहमार्ग; पण यामुळे मिरज जंक्शनचे महत्त्व कमी होणार नाही. तेथे रिकामे प्लॅटफार्म उपलब्ध होऊन लांब पल्ल्याच्या नव्या गाड्या सोडण्यास मदत होईल.
असा असेल नवा लोहमार्ग
- लांबी १० किलोमीटरचा ड श्रेणीचा लोहमार्ग
- १ हजार ६७६ मिलीमीटर रुंदीचा ब्रॉडगेज
- विद्युतीकरणाचा समावेश, सध्या तरी एकेरीच
- कमाल गती १६० किलोमीटर प्रतितास
- अंकली व धामणीदरम्यान स्थानकाची शक्यता
- नव्या क्वाड लाइनसाठी भूसंपादन करावे लागणार
फायदे-तोटे काय?
- कोल्हापुरातून कर्नाटकात व सोलापूरकडे जाणाऱ्या गाड्यांचे इंजिन बदलावे लागणार नाही
- इंजिन बदल नसल्याने सुमारे २० मिनिटे वेळेची बचत
- मिरज जंक्शनमधील गाड्यांची गर्दी कमी होणार, नव्या गाड्या सोडणे शक्य
- तिरुपती, राणी चेन्नम्मासह कोल्हापुरातून सुटणाऱ्या गाड्या मिरजेत जाणार नाहीत
- या गाड्यांतून मिरजेतून कर्नाटकात जाणारा माल अंकली-धामणीत आणावा लागेल
- कोल्हापूर-बेळगाव, कोल्हापूर-सोलापूर मार्गावरील प्रवाशांना अंकली-धामणीतील नव्या स्थानकात यावे लागेल
- कोल्हापुरातून मिरज-सांगलीला दररोज अपडाऊन करणाऱ्या प्रवाशांना फटका
- कोल्हापूर ते पुणे मार्गावरील गाड्या मात्र पूर्ववत मिरजेतच थांबतील