मानाजी धुमाळरेठरे धरण (सांगली) : नुकताच संपलेला श्रावण आणि रविवारची पर्वणी साधत मरळनाथपूर (ता. वाळवा) येथे काही हाैशी तरुणांनी रात्री उशिरा डोंगराच्या पायथ्याशी पार्टीचा बेत आखला. मात्र, पार्टीच्या ठिकाणी चक्क बिबट्या येऊन बसल्याने मांडलेली चूल तशीच साेडून साऱ्यांनी धूम ठाेकली.मरळनाथपूर (ता. वाळवा) येथील काही युवक व गावकऱ्यांनी गावाबाहेरील असणाऱ्या डोंगर पायथ्याच्या माळरानावर रविवारी रात्री पार्टीचा बेत आखला होता. दुपारपासूनच उत्साही तरुणांनी तयारी चालवली हाेती. डाेंगरपायथ्याशी ठिकाण ठरवून दाेस्तमंडळींना निमंत्रणे गेली. दाेघे-तिघे स्वयंपाकाची जुळणी लावण्यासाठी पुढे गेले. अन्य मित्रमंडळी रात्री मिशीवर ताव मारत डोंगर पायथ्याकडे रवाना झाली. गप्पांचा फड जमला. निराेपानंतर आणखी काहीजण येणार हाेते.एवढ्यात झाडापासून २० ते ३० फूट अंतरावर अंधारात भला मोठा बिबट्या बसल्याचे दिसले. अचानक बिबट्याला पाहून सर्वांची घाबरगुंडी उडाली. सारा खानसामा जागीच टाकून सर्वजण गावाकडे पळत सुटले. ‘बिबट्याने आपलाच फडशा पाडला असता’ असे म्हणत साऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. शेवटी एका उत्साही कार्यकर्त्यांने गावाजवळच चूल लावत पुन्हा जुळणी केली, पण पार्टी केलीच.. साेमवारी दिवसभर या पार्टीची जाेरदार चर्चा गावात होती.
Sangli- श्रावण संपला, डोंगराच्या पायथ्याशी पार्टीचा बेत आखला; अन् पंगतीला बिबट्या आला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 11:31 AM