इस्लामपूर : नवेखेड (ता.वाळवा) येथील चार महिन्यांची गर्भवती असणाऱ्या सावित्रीच्या लेकीने अंधश्रद्धेत अडकलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी आज ग्रहणाशी डोळे भिडवले आणि अंधश्रद्धेला छेद देण्याचे धाडस दाखवले.
नवेखेड येथील पूजा ऋषीराज जाधव व ऋषिराज मोहन जाधव या उच्चशिक्षित जोडप्याने पुढाकार घेऊन समाजातील ग्रहण न पाहण्याच्या अनिष्ठ प्रथेला मंगळवारी मूठमाती दिली व समाजासमोर आदर्श ठेवला. पूजा जाधव या चार महिन्यांच्या गर्भवती आहेत. ग्रहण काळात भाजी चिरणें, फळे तोडने, अन्न ग्रहण करणे, मांडीवर मांडी घालून बसने वर्ज असते मात्र हे सर्व करून पूजा जाधव यांनी सोलर चष्म्यातून थेट ग्रहणात काळवंडलेल्या सूर्याशी डोळेही भिडवले. त्यांच्या या धाडसाला घरातील सर्व कुटुंबाचे सहकार्य लाभले. पूजा जाधव यांच्या आजलसासू शांताबाई जाधव, सासू माजी सरपंच छाया जाधव, सासरे मोहन जाधव, दीर पंकज जाधव, जाऊ प्रियांका जाधव यांची साथ लाभली.
दरम्यान ग्रहण काळात जे करायचे नाही, ते करून दाखवत, पूजा जाधव यांनी आदर्श निर्माण केला. हा उपक्रम राबवण्यासाठी शंभूराजे प्रतिष्ठान नवेखेड,व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांचे सहकार्य लाभले,यावेळी प्रा. शंकर चव्हाण,बाजीराव ताटे, अंकुश चव्हाण उपस्थित होते.