सांगली: प्रस्तावित नव्या पुणे-बंगलुरु ग्रीनफिल्ड महामार्गामध्ये जाणाऱ्या शेतजमीनींसाठी रेडीरेकनरच्या पाचपट भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली. त्यासाठी आंदोलनाचा निर्णय झाला. माहुली (ता. खानापूर) रविवारी किसान सभेतर्फे शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी भीमराव सूर्यवंशी होते. सभेचे जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख म्हणाले, रत्नागिरी- नागपूर महामार्गबाधीत शेतकऱ्यांसाठी किसान सभेने आंदोलन उभे केले होते, त्यामुळे त्यांना योग्य मोबदला मिळाला. त्याच धर्तीवर नव्या पुणे-बंगलुरु महामार्गासाठीही संघर्ष उभा केला जाईल.
राज्य सरकारने गतवर्षी एका परिपत्रकाद्वारे भूसंपादनाच्या मोबदल्याचे गुणांकन एकावर आणण्याचा निर्णय जाहीर केला आहे. हे गुणांकन अत्यंत कमी असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे. सन २०१३ च्या भूमी अधीग्रहण कायद्यानुसार रेडीरेकनरच्या पाचपट रक्कम मिळाली पाहिजे. त्यासाठीच्या लढ्यात महामार्गबाधित शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. देशमुख म्हणाले, आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून २ ऑक्टोबरच्या ग्रामसभांत पाचपट भरपाईचे ठराव ग्रामपंचायतींनी करावेत. पुढील टप्पा म्हणून ८ ऑक्टोबर रोजी माहुली येथे महामार्गबाधित शेतकऱ्यांचा मेळावा घेतला जाईल. त्यावेळी आंदोलनाची निश्चित दिशा ठरवली जाईल. बैठकीला रंगाभाऊ बंडगर, राजेंद्र माने, विपुल माने, धीरज देशमुख, नारायण माने, संभाजी माने, सचिन सूर्यवंशी, आबासाहेब देशमुख, गोरख माने, माधव माने, किरण पवार आदी उपस्थित होते.
...तर कायदेशीर लढारत्नागिरी - नागपूर महामार्गाची भरपाई देताना तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ तालुक्यांतील शेतकऱ्यांना कमी-जास्त भरपाई देण्यात आली आहे. काही ठिकाणी चार ते पाचपटींपर्यंत, तर काही ठिकाणी तीनपट भरपाई दिली आहे. या असमानतेमुळे शेतकरी संतप्त आहेत. त्यांनी भरपाईची रक्कम स्वीकारली आहे, पण कायदेशीर लढाईचा हक्क कायम ठेवला आहे. काही शेतकरी न्यायालयात गेले आहेत, तर काहींनी लवादाकडे दाद मागितली आहे. नव्या पुणे-बंगळुरु महामार्गाच्या पाचपट भरपाईसाठीही प्रसंगी कायदेशीर लढाईचा विचार केला जाईल असे देशमुख म्हणाले.