अशोक डोंबाळेसांगली : जिल्ह्यात दरवर्षी एक लाख ८० हजार टन बेदाण्याचे उत्पादन घेतले जात होते. यावर्षी द्राक्षाला दर न मिळाल्यामुळे शेतकरी बेदाणा उत्पादनाकडे वळल्यामुळे ५० हजार टनाने बेदाण्याचे उत्पादन वाढून दोन लाख ३० हजार टन झाले आहे. उत्पादन वाढूनही बेदाण्याचे दर स्थिर असल्यामुळे शेतकरी समाधानी आहे. ताकारी, टेंभू, म्हैसाळ आणि आरफळ सिंचन योजनांमुळे द्राक्षाचे क्षेत्र वाढत असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात सध्या एक लाख हेक्टरच्या पुढे द्राक्षाचे क्षेत्र गेले आहे. अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे द्राक्षबागांच्या छाटणीवर परिणाम झाल्यामुळे एकाच वेळी बाजारात द्राक्षांची आवक झाली. यामुळे चार किलो द्राक्षाच्या पेटीला ८० ते १२० रुपयापर्यंत दर मिळाला. म्हणूनच शेतकरी बेदाणा उत्पादनाकडे वळला. परिणामी दरवर्षी जिल्ह्यात एक लाख ७० ते एक लाख ८० हजार टन बेदाणा तयार होत होता. यावर्षी यामध्ये विक्रमी वाढ होऊन दोन लाख ३० हजार टनापर्यंत बेदाणा उत्पादन झाले आहे. सध्या जिल्ह्यातील लहान व मोठी ११० शीतगृह असून ती सध्या बेदाण्याने फुल झाली आहेत. अनेक शेतकऱ्यांना बेदाणा ठेवण्यासाठीही शीतगृहामध्ये जागा मिळत नसल्यामुळे घरातच ठेवला आहे. काहींचा बेदाणा जागा नसल्यामुळे शेडवर पडून असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
बेदाणा दर (प्रतिकिलो)
- चांगल्या बेदाणा : १५० ते २००
- हिरवा बेदाणा : १०० ते १६०
- पिवळा बेदाणा : ९० ते १३०
- काळा बेदाणा : ३० ते ५०
- काळा बेदाणा गोल : ५० ते ६५
वीस टक्के बेदाणा शेडवरचराज्यातील बेदाणा हंगाम संपत आला आहे. यंदा बेदाण्याचे विक्रमी उत्पादन झाले असून शीतगृह फुल्ल आहेत. अद्यापही तयार झालेला २० टक्के बेदाणा शेडवरच आहे. त्यामुळे तयार झालेला बेदाणा कुठे ठेवायचा, असा प्रश्न बेदाणा उत्पादकांना पडला आहे.
द्राक्षाचा सरासरी उताराही वाढलानाशिक, सोलापूर, विजापूर भागांमध्ये द्राक्ष पीक सांगली जिल्ह्यापेक्षा मोठ्याप्रमाणावर घेतले जात आहे. देशाअंतर्गत विकल्या जाणाऱ्या द्राक्षापासून शेतकऱ्यांनी बेदाणा तयार केला. त्यामुळे बेदाणा शेडवर बेदाणा निर्मितीसाठी गर्दी झाली. बेदाणा तयार करण्यासाठी नंबर लागले होते. द्राक्षाच्या सरासरी वाढलेल्या उताऱ्यामुळे यंदा बेदाणा उत्पादनात वाढ झाली आहे.
द्राक्षाला चांगला दर मिळाला नसल्यामुळे शेतकऱ्यांनी बेदाणा तयार केला आहे. दरवर्षी एक लाख ८० हजार टन बेदाणा उत्पादन होते. यावर्षी दोन लाख ३० हजारापर्यंत वाढले आहे. बेदाणा तयार करताना त्याच्या दर्जाकडे यावर्षी शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. -सतीश मालू, माजी अध्यक्ष, सांगली-तासगाव बेदाणा मर्चंट असोसिएशन.