सांगली : ग्रामपंचायत निवडणुकीत मिरज तालुक्यातील नरवाड, बेडग आणि खटाव गावांतील थेट सरपंचपद बिनविरोध केले, तर त्या गावांना एक लाखाचे बक्षीस देऊ, अशी घोषणा ब्रह्मा उद्योग समूहाचे प्रमुख मारुती माळी यांनी आज, मंगळवारी केली. ग्रामपंचायत निवडणुकीत होणारा लाखो रुपयांचा चुराडा टाळण्यासाठी व निवडणुकीच्या माध्यमातून गावागावांत गट-तट निर्माण होऊन होणारे मतभेद टाळण्यासाठी माळी यांनी ही अभिनव घोषणा केली आहे.गावाची एकी अबाधित राखण्यासाठी थेट सरपंचपद बिनविरोध केल्यास त्या गावांना एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर तिन्ही गावांत निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या अनोख्या संकल्पनेत कोणती गावे यशस्वी ठरतात, हे लवकरच दिसून येणार आहे. माळी यांनी आजवर सामाजिक विधायक उपक्रमांना नेहमी अग्रक्रम दिला आहे. अनेक निराधारांना आधार दिला आहे.खटाव, बेडग आणि नरवाड या गावात ही संकल्पना रुजविण्यासाठी राजकीय नेत्यांचेही प्रयत्न सुरू आहेत. थेट सरपंचपद बिनविरोध करून विकासकामांसाठी एक लाख रुपयांचे बक्षीस कोणाला मिळणार, ही संकल्पना स्थानिक राजकीय नेते कितपत उचलून धरणार, हे ७ डिसेंबरपर्यंत समजणार आहे.जिल्ह्यातील ४४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी काल, सोमवारी सुरू झाली. अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी सरपंच पदासाठी ५२, तर सदस्यांसाठी ४७ असे ९९ अर्ज दाखल झाले.
सरपंचपद बिनविरोध केल्यास एक लाखाचे बक्षीस, सांगलीतील 'या' गावांसाठी उद्योजकाची घोषणा
By श्रीनिवास नागे | Published: November 29, 2022 5:04 PM