सांगली : प्रदीर्घ संघर्षानंतर सांगलीरेल्वे स्थानकाला लाभलेल्या चंडीगड-यशवंतपूर संपर्क क्रांती एक्स्प्रेसचे बुधवारी सांगलीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. आठवड्यातून दोन दिवस ही गाडी सांगलीत थांबणार असल्याने प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.संपर्क क्रांती एक्स्प्रेसचे सांगली स्थानकावर सायंकाळी ४:२० वाजता आगमन झाले. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. गाडीच्या स्वागतासाठी सांगलीचे खासदार विशाल पाटील, भाजप नेत्या नीता केळकर, नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य डॉ. दिलीप पटवर्धन, सुकुमार पाटील, सांगली जिल्हा गुरुद्वारा समितीचे सदस्य रमिंदरसिंग चंडोक व गुरुद्वारा संस्थेचे अध्यक्ष उपस्थित होते.चंडीगड-यशवंतपूर (बंगळुरू) संपर्क क्रांती सुपरफास्ट एक्स्प्रेसला सांगली स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. तसेच वास्को-द-गामा ते निजामुद्दीन एक्स्प्रेसला किर्लोस्करवाडीत थांबा दिला आहे.सांगलीतून दिल्लीपर्यंत जाणारी पहिली एक्स्प्रेस गाडी क्र २२६८६ चंडीगड-यशवंतपूर संपर्क क्रांती प्रत्येक बुधवारी व रविवारी दुपारी ३:५२ वाजता सांगलीत येईल. तर गाडी क्र. २२६८५ यशवंतपूर-चंडीगड संपर्क क्रांती प्रत्येक गुरुवारी व रविवारी पहाटे सुमारे ३:३२ वाजता सांगलीत येईल. सांगली रेल्वे स्थानकापासून देशाची राजधानी दिल्लीपर्यंत जाणारी ही पहिली एक्स्प्रेस गाडी आहे. त्यामुळे या गाडीच्या स्वागतासाठी राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, रेल्वे प्रवासी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
‘संपर्क क्रांती एक्स्प्रेस’चे सांगलीत जल्लोषी स्वागत; सांगलीतून दिल्लीपर्यंत जाणारी पहिली एक्स्प्रेस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 4:39 PM