युनूस शेखइस्लामपूर : वारणा धरणग्रस्त आणि चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांनी आपल्या मागण्यांसाठी सुरू केलेले आंदोलन आज तिसऱ्या दिवशीही त्याच त्वेषाने कायम ठेवले आहे. सरकारकडून आता तारीख पे तारीख न घेता निर्णय घेऊनच उठायचे असा निर्धार आंदोलकांनी केला आहे. आज, दुपारी भर रस्त्यावरच या आंदोलकांनी आपली पंगत टाकत जेवण उरकून घेतले. दरम्यान कचेरी परिसरात दंगल नियंत्रण करण्याच्या उपाय योजनांसह मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.सोमवार (दि.१६)पासून धरण व प्रकल्पग्रस्तांनी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. पहिल्या दिवशी वाटाघाटी फिस्कटल्यावर आंदोलनाला सुरुवात झाली. काल, दुसऱ्या दिवशी थेट चाल करत गनिमी काव्याने आंदोलकांनी तहसील कचेरीत घुसून एका मजल्याचा ताबा घेतला. आंदोलनात महिलांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पोलिसांना कसरत करावी लागत आहे. दरम्यान, वृद्ध महिलेला वाचविताना पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण किरकोळ जखमी झाले. आज, बुधवारी तिसऱ्या दिवशी पुन्हा आंदोलक मोठ्या संख्येने जमले आहेत. त्यामुळे या परिसरातील सर्व रस्ते बंद करण्यात आलेत. एक वाजता भर उन्हात आंदोलकांनी आपली जेवणे उरकून घेत पुन्हा नव्या दमाने आग ओकणाऱ्या सूर्याला अंगावर घेत आपल्या मागण्यांची बरसात कायम ठेवली.बैठक सुफळ झाल्याचे वृत्त..!गेल्या तीन दिवसांपासून धरण व प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरू आहे. आज तिसऱ्या दिवशी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात यावर आंदोलक प्रतिनिधी आणि प्रशासनाची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून हे आंदोलन थांबण्याची चिन्हे आहेत.
इस्लामपुरात भर उन्हात रस्त्यावरच आंदोलक महिलांची पंगत, प्रकल्पग्रस्तांचा तिसऱ्या दिवशीही ठिय्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 2:08 PM