सांगली : गोवरच्या लसीपासून वंचित राहिलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कृती आराखडा तयार केला आहे. जिल्हाभरात १६२ गावे दुर्गम असून तेथे पोहोचून लसीकरणासाठी विशेष मोहीम सुरु केली आहे.राज्यात मुंबईसह काही शहरांत गोवरचा उद्रेक सुरु झाला आहे. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातही आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. सर्व पात्र बालकाचे लसीकरण झालेच पाहिजे याकडे लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या मार्चपासून ऑक्टोबरअखेर ६३ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये महापालिका क्षेत्रात ५ हजार ६४ आणि उर्वरीत जिल्ह्यात २७ हजार ९५ बालकांना लस टोचण्यात आली आहे. एकूण लसीकरण ३० हजार ८२३ इतके आहे. हे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत.दुर्गम भागात मनुष्यबळाअभावी काही बालके लसीकरणापासून वंचित राहू शकतात. हे लक्षात घेऊन अशा गावांची माहिती घेण्यात आली. शिराळा, जत, वाळवा, आटपाडी तालुक्यांतील काही गावे डोंगराळ भागात व दुर्गम आहेत. तेथे घरोघरी जाऊन बालकांचा शोध घेण्याचे व लसीकरणाचे आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.
नऊ महिने पूर्ण झालेल्या व लस न घेतलेल्या बालकांना नजीकच्या आरोग्य केंद्रात लसीची मात्रा द्यावी. सहा महिन्यानंतर दुसरी मात्रा द्यावी. प्रत्येक बालकाला लस मिळालीच पाहिजे, यादृष्टीने मोहीम सुरु केली आहे. वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत लस देता येते, यामुळे वंचित बालकांनी तात्काळ गोवर-रुबेला लसीची मात्रा घ्यावी. - डॉ. दिलीप माने, जिल्हा आरोग्याधिकारी
तालुकानिहाय दुर्गम गावे अशीआटपाडी १३जत १५खानापूर ५कडेगाव १कवठेमहांकाळ २४मिरज २६पलूस ६तासगाव ४६शिराळा १३वाळवा १३