सांगली : जिल्हा परिषदेतील दुसरा आणि तिसरा मजला धोकादायक बनला आहे. चार दिवसांपूर्वी दुसऱ्या मजल्यावरील मुख्य सभागृहकडे जाणाऱ्या पोर्चचा काही भाग कोसळला होता. शुक्रवारी तिसऱ्या मजल्यावरील महिला व बाल कल्याण विभागातील छताचा स्लॅब कोसळला आहे. या विभागातील एक महिला कर्मचारी प्रसंगावधान राखत बाजूला सरकल्याने मोठी दुर्घटना टळली. या विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप यादव आणि कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेऊन समस्यांची कैफियत मांडली.सध्या जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभागाच्या दुुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे सदर कार्यालयीन काम मोकळ्या पॅसेजमध्ये सुरू आहे. शुक्रवारी दुपारी तीनच्या दरम्यान पॅसेजमधील स्लॅबचा काही भाग अचानक कोसळला. या घटनेनंतर कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत उपमुख्य कार्यकरी अधिकारी यादव व इतर कर्मचाऱ्यांनी सीईओ तृप्ती धोडमिसे यांची भेट घेऊन कैफियत मांडली.
दरम्यान, सद्य:स्थितीत येथील कर्मचारी हे स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. त्यामुळे एखाद्याचा बळी जाण्याअगोदर जिल्हा परिषदेच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून धोकादायक भाग उतरवून घ्यावा, अशी मागणी होत आहे.