सांगली - शहरात छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याबाबत विविध सामाजिक संघटनांनी आंदोलन उभारले होते. पण जागा निश्चितीबाबत एकमत होत नसल्याने पुतळ्याचा प्रश्न रखडला होता. मंगळवारी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत प्रतापसिंह उद्यानात पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला सर्वांनीही सहमती दर्शविली.
सांगलीत छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याची मागणी मावळा प्रतिष्ठान, रॉयल युथ फाऊंडेशन, साथीदार ग्रुप यांच्यासह तत्कालीन उपमहापौर धीरज सूर्यवंशी यांनी केली होती. गेल्या दोन वर्षांपासून पुतळ्यासाठी आंदोलने सुरू आहेत. सहा महिन्यांपूर्वी महापौर सूर्यवंशी यांनी महासभेत पुतळा उभारणीचा ठराव केला; पण जागेचा निर्णय प्रलंबित होता. जागा निश्चितीसाठी यापूर्वी दोनदा बैठकाही झाल्या. मावळा प्रतिष्ठान व साथीदार ग्रुपने दोन दिवसांपूर्वी महापौरांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता.
या पार्श्वभूमीवर मंगळवारी महापौरांच्या दालनात बैठक घेण्यात आली. या बैठकीला स्थायी समितीचे सभापती धीरज सूर्यवंशी, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, काँग्रेसचे संजय मेंढे, भाजपचे विनायक सिंहासने, मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष संजय पाटील, नगरसेवक अभिजित पाटील, मयूर पाटील, तौफिक शिकलगार, मनगू सरगर, ऋषीकेश पाटील यांच्यासह सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत शहरातील तीन ते चार जागांवर खल झाला. अखेर प्रतापसिंह उद्यानात छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला सामाजिक संघटनांनीही सहमती दर्शवली. यानंतर आयुक्त सुनील पवार यांची भेट घेऊन जागा निश्चितीची माहिती देण्यात आली. यावेळी मयूर पाटील व तौफिक शिकलगार यांनी प्रभाग १६ मध्ये पुतळा उभारण्यात येत असल्याबद्दल महापौर व आयुक्तांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.
रणगाड्याच्या जागी पुतळा
महापालिकेने प्रतापसिंह उद्यान सुशोभीकरणाचे काम हाती घेतले आहे. भारतीय सैन्यांच्या पराक्रमाला उजाळा देण्यासाठी नुकतेच १९७१ च्या युद्धात वापरलेला रणगाडा उद्यानात ठेवण्यात आला आहे. त्याच्यासाठी चबुतराही तयार करण्यात आला होता. महिन्यापूर्वीच दिमाखदार सोहळ्याने रणगाड्याचे लोकार्पण केले होते. आता हा रणगाडा हटवून त्या जागी छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे.