सांगली : सांगली, सोलापूर जिल्ह्यांसह मुंबई परिसरातून मोठ्या वाहनांची चोरी करण्यात पटाईत असलेल्या वाहन चोरट्यास इस्लामपूरच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अवघ्या ४८ तासात जेरबंद करत त्याच्या मुसक्या आवळल्या. ऊस तोडणी टोळ्यांना न्यायला आलोय असे सांगत शेतकरी बनलेल्या पोलिसांनी १५ गावात भटकंती करत या अट्टल चोरट्यास पोलिसी खाक्या दाखविला. पोलिसांनी ऐन दिवाळी सणाचा आनंद बाजूला ठेवत या कारवाईतून आपली कर्तव्य तत्परता दाखवून दिली.दत्तात्रय बापु कांबळे (वय २६ वर्षे रा. सांगोला,जि. सोलापुर) असे या चोरट्याचे नाव आहे. आहे.त्याला येथील न्यायालयाने १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली आहे.त्याच्यावर सांगली, सोलापुर, मुंबई या जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल असल्याने त्याच्याकडुन चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.पोलीस अधीक्षक डॉ.बसवराज तेली व अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले यांनी चोरी, घरफोडी,जबरी चोरी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे उघडकिस आणण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान पेठनाका येथून दि.२४ रोजी दिवाळीच्या पहिल्या पहाटे धनाजी जाधव (रा. महादेववाडी ता. वाळवा)यांच्या मालकीचा १८ लाख रुपये किंमतीचा १२ चाकी ट्रकची चोरी झाली होती. त्यावर प्रभारी पोलीस उपअधीक्षक पद्मा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी हा गुन्हा उघडकिस आणण्यासाठी पथकाला कामाला लावले होते.इस्लामपुर गुन्हे प्रकटिकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रविण साळुंखे, हवालदार दिपक ठोंबरे, अरुण पाटील, आलमगीर लतिफ, सचिन सुतार, सुनील शिंदे यांनी गोपनीय माहिती काढत उस्मानाबाद व बीड जिल्हा हद्दीतील १५ गावात २ दिवस शेतकरी वेशांतर करुन या चोरट्याचा माग काढला. तो उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब पोलीस ठाणे हद्दीत ट्रक विक्री करण्यासाठी येणार असल्याची बातमी मिळताच त्यास चोरीस गेलेल्या ट्रकसोबत ताब्यात घेतले. यावेळी त्याने पेठनाका येथून ट्रक चोरल्याची कबुली दिली. या कारवाईत सांगली सायबर सेलचे कॅप्टन गुंडेवाड यांच्यासह उस्मानाबादच्या गुन्हे शाखेचे अमोल चव्हाण,अशोक ढगारे यांचे सहकार्य मिळाले.
सांगली: तपासासाठी पोलिसांनी शेतकरी बनून १५ गावात केली भटकंती, ४८ तासात अट्टल चोरट्यास ठोकल्या बेड्या
By श्रीनिवास नागे | Published: October 28, 2022 6:12 PM