सांगली : कौटुंबीक वादातून पोलिसात तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेच्या तीन वर्षीय बालकाच्या अपहरण प्रकरणाचा पोलिसांनी सहा तासात छडा लावला. याप्रकरणी वैशाली शामसुंदर रवीदास (रा. पुष्पराज चौक, सांगली) हिने फिर्याद दिली होती. पाेलिसांनी रेशमादेवी शामसुंदर रवीदास (वय २५), बुदन उर्फ औकात सत्येंद्र रवीदास (२१), मिथुनजय कुमार सत्येंद्र रवीदास (१९) व बसनीदेवी सत्येंद्र रवीदास (४०, सर्व रा. गया, बिहार) यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवार, दि. २५ रोजी दुपारी दोनच्या सुमारास सांगली शहर पोलीस ठाण्याच्या आवारातून हे अपहरण झाले होते. फिर्यादी वैशालीचा पती शामसुंदर याची रेशमीदेवी ही पहिली पत्नी आहे. वैशाली ही हॉटेलमध्ये काम करुन गुजराण करते. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर याबाबत तक्रार देण्यासाठी वैशाली आपला मुलगा सुजितसोबत सांगली शहर पोलीस ठाण्यात आली होती. यावेळी सुजित पोलीस ठाण्याच्या आवारात खेळत असताना, संशयितांनी वैशालीची नजर चुकवून त्याचे अपहरण केले होते. त्यानंतर लगेचच वैशालीने पोलिसात तक्रार दिली होती.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. सांगली, मिरज बसस्थानक परिसरात त्याचा शोध सुरु असतानाच, महाराष्ट्र एक्स्प्रेसमधून त्याला घेऊन संशयित पसार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सातारा रेल्वे स्थानकात सर्व संशयितांना ताब्यात घेत अपहृत बालकाची सुटका केली.
सांगली शहरचे निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप पाटील, गुंडोपंत दोरकर, झाकीरहुसेन काझी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.