दरीबडची : निवडणूक लोकसभा, विधानसभेची असो की गाव पातळीवरची, निकालापूर्वी पैजांना ऊत येतोच. काही पैशाच्या स्वरूपात, काहीजण वाहनांच्या तर काहीजण थेट जमिनही डावावर लावतात. मात्र, वाळेखिंडी (ता. जत) येथे एका अनोख्या पैजेची चर्चा सर्वत्र रंगली आहे. ही पैज आहे ५१ झाडांच्या वृक्षारोपणाची.लोकसभा निवडणुकीसाठी जत तालुक्यात चुरशीने मतदान पार पडले आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र खासदार संजय पाटील विजयी होणार की विशाल पाटील, यावरुन पैजा लावल्या जात आहेत. काहींनी पैज लावली म्हणून त्यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. आता वाळेखिंडीत अनोखी पैज लागली असून त्याला नावसुद्धा दिले आहे ‘पैजेचे झाड’. जत तालुका दुष्काळी असताना वाळेखिंडीत तरुणांनी एकत्रित येत वृक्ष संवर्धनाचा नारा दिला. त्यांच्या अनोख्या उपक्रमाला गावातील अनेकांनी साथ दिली.
यासाठी अपूर्वा फाऊंडेशनच्यावतीने गेल्या वर्षभरापासून वृक्ष लागवडीच्या चळवळीला गती दिली. वृक्ष संवर्धन करण्यासाठी केवळ फोटोसेशन होऊ नये याची दक्षता घेतली गेली. वाढदिवस, लग्न, बाळाच्या जन्मानिमित्त किंवा कोणाच्याही स्मरणार्थ वृक्ष लागवड केली जाते. वृक्षारोपण केलेल्या झाडांचे जतन व संवर्धन चांगल्याप्रकारे झाले आहे. सध्या गावात ५०० झाडे दिमाखात उभी आहेत.लोकसभेला विजयी कोण होणार, याबाबत वाळेखिंडीत ५१ वृक्ष लागवडीची अनोखी पैज अपूर्वा फाऊंडेशनचे तात्यासो शिंदे व उद्योजक महादेव हिंगमिरे यांच्यात लागली आहे. विशाल पाटील विजयी झाले तर महादेव हिंगमिरे व संजय पाटील विजयी झाले तर तात्यासो शिंदे ५१ झाडे लावणार आहेत.निसर्गसंवर्धनास चालनावाळेखिंडीत पैशांची किंवा इतर कोणत्याही स्वरुपाची पैज न लावता पर्यावरण प्रेमी आणि निसर्गावर प्रेम करणारी पैज लावली आहे. ही अनोखी पैज लावल्याने दोघांचे गावातून कौतुक होत आहे. पर्यावरणपूरक पैज लागल्याने पर्यावरणप्रेमींनी याचे स्वागत केले आहे.