मिरज : मिरजेत कर्नाटकातून येणारी वाहने अडविण्याच्या तक्रारीची दखल घेत नूतन पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी वाहतूक पोलिसांना तपासणी नाके बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे मिरजेत वाहनांनी गजबजलेल्या महात्मा फुले चौकातून वाहतूक पोलीस गायब झाले आहेत.मिरजेजवळ दहा किलोमीटर अंतरावर कर्नाटक सीमाभाग असून, मिरजेतून कर्नाटकत वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा आहे. परराज्यातून येणारे वाहन असल्याच्या कारणावरून मिरजेत कर्नाटकातील प्रवासी व मालवाहतूक करणारी वाहने अडवून तपासणी करण्यात येते. यासाठी महात्मा फुले चौकात सहा पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले होते. चौकातील तपासणी नाक्यावर कर्नाटकातील वाहनधारकांची अडवणूक करण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत.यापूर्वी कर्नाटकातील भाजप पदाधिकाऱ्यांनीही पालकमंत्री सुरेश खाडे यांची भेट घेऊन मिरजेत पोलिसांच्या त्रासाबद्दल तक्रारी केल्या होत्या. नूतन पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांचे सीमाभागातील रायबाग हे गाव आहे. कर्नाटकातील वाहनधारकांना मिरजेत होणाऱ्या त्रासाची त्यांनाही माहिती असल्याने त्यांनी याबाबतचे आदेश दिले.नवीन जिल्हा वाहतूक शाखा कशासाठी?
- जिल्ह्यात प्रत्येक शहरात वाहतूक नियंत्रण शाखा व बहुतांश पोलीस ठाण्यांकडे वाहतूक नियंत्रक पोलीस कर्मचारी आहेत. असे असतानाही जिल्ह्यात नव्याने जिल्हा वाहतूक शाखेची निर्मिती केली आहे.
- जिल्हा वाहतूक शाखेचे कर्मचाऱ्यांचे नेमके काम कोणते हे स्पष्ट नाही. यामुळे शहराबाहेर वाहने अडविण्याच्या स्पर्धेत आणखी एका विभागाची वाढ झाली आहे.
- वाहनधारकांच्या अडवणुकीच्या तक्रारीबाबत हे काम कोणाचे याबाबत संभ्रम निर्माण होत आहे. यामुळे नवीन जिल्हा वाहतूक शाखा कशासाठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- कर्नाटकातून मिरज शहरात येणारी वाहने अडविणे बंद झाले तरी अद्याप शहराबाहेर थांबून वाहने अडविण्यात येत असल्याचे चित्र आहे.
अवैध वाहतुकीवरच कारवाईमिरजेतील कर्नाटकातील वाहनांच्या तपासणीचे नाके बंद करून अवैध वाहतूक होत असेल तर कारवाईचे आदेश पोलिसांना दिले आहेत. यामुळे चार दिवसांपासून महात्मा फुले चौकातील तपासणी नाका बंद असल्याने चौकात वाहनांची गर्दी कमी झाल्याचे चित्र आहे.