सांगली : बायपास रस्त्यावर आढळलेल्या अल्बिनो सापाची प्राणिमित्रांनी मुक्तता करुन सुरक्षित ठिकाणी सोडले. रंगविरहित त्वचेच्या प्राण्याला अल्बिनो म्हटले जाते. बायपास रस्त्यावर एका घरात पांढरा साप असल्याचा निरोप सर्पमित्र स्वप्नील यादव यांना मिळाला. परिसरातील दलदल आणि गवताळ मैदानातून तो घरात घुसला होता. रंग नसलेल्या सापाला पाहून संबंधित कुटुंबियदेखील चक्रावले. सुमारे चार फुट लाबींच्या या पांढऱ्या सापावर मध्येमध्ये पिवळे पट्टे होते. रहिवाशांनी सापाला न मारता सर्पमित्र यादव यांना कळविले. यादव यांनी सापाला पकडून इन्साफ फाऊंडेशनचे अध्यक्ष जावेद शेख यांना माहिती दिली.बिनविषारी कवड्या जातीच्या या सापामध्ये रंगद्रव्यांच्या कमतरतेमुळे त्वचेला रंग आला नव्हता. सापाच्या अंड्यांना पुरेशी उब मिळाली नाही, तर रंगद्रव्यांचा अभाव निर्माण होतो. जन्मल्यानंतर त्यांच्या त्वचेचा मूळ रंग हळूहळू नष्ट होतो. पूर्ण पांढरा पडतो. त्याच्या वेगळ्या रंगामुळे शिकाऱ्यांचे भक्ष्य बनतो. स्वसंरक्षणासाठी ते आक्रमक होतात, चावा घेण्याचा प्रयत्न करतात. इन्साफ फाउंडेशनचे मुस्तफा मुजावर यांनी या सापाला मानद वन्य जीवरक्षक अजित पाटील यांच्या ताब्यात दिले. पाटील यांनी निसर्गात मुक्त केले.
सांगलीत लांबलचक कवड्या साप, पण त्याला रंगच नाही!!
By संतोष भिसे | Published: August 10, 2023 4:57 PM