मिरज/कवठेमहांकाळ : मिरज-पंढरपूर महामार्गावर बोरगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे टोलनाक्याजवळ पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी निघालेल्या पायी दिंडीत भरधाव दुचाकी घुसल्याने दिंडीतील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. पाचजण गंभीर जखमी झाले. हा अपघात गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास झाला.सुमन धोंडिबा पाटील (वय ४०, रा. मोरेवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. अतुल रघुनाथ पाटील (वय २७, रा. अर्जुनवाड, ता. शिरोळ), श्रीपती गोविंद देसाई (वय ७०, रा. हिंगणगाव, ता. कवठेमहांकाळ), अनिता ज्ञानू दुधाळ (वय ३२, रा. अंकले, ता. जत), प्रदीप विष्णू मगदूम (४२, रा. अर्जुनवाड, ता. शिरोळ) अशी जखमींची नावे आहेत. धडक देणारी दुचाकीस्वार महिलाही गंभीर जखमी झाली. तिचे नाव समजू शकले नाही.
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड परिसरातील भाविक कार्तिक वारीसाठी पंढरपूरकडे निघाले होते. भाविक महामार्गावरून चालत होते. कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव गावच्या हद्दीत दिंडी आल्यानंतर मागून येणारी भरधाव दुचाकी (क्र. एमएच ०९, जीडी ४३९१) दिंडीत घुसली. वारकऱ्यांच्या अंगावर गाडी गेल्याने एक महिला ठार तर पाच वारकरी जखमी झाले. दुचाकीस्वार चालविणारी महिलाही जखमी झाले.अपघातानंतर महामार्ग पोलिस व कवठेमहांकाळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृत महिलेचे मिरज शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी दुचाकीस्वार महिलेवर कवठेमहांकाळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सीसीटीव्ही फुटेज ताब्यातअपघाताचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासाकरिता घेतले आहे. चार ते पाच वारकरी दिंडीपासून काही अंतर मागे राहिले होते. रस्त्याच्या अगदी कडेने ते चालत होते. मात्र, भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीस्वार महिलेचा वाहनावरील ताबा सुटल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. त्याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.