कुरळप : कुरळप (ता. वाळवा) येथील महिलेचा ऐतवडे खुर्द हद्दीतील उसाच्या शेतामध्ये पोटावर विळ्याने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. इंदुबाई राजाराम पाटील (वय ६५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. खुनाचे नेमके कारण समजले नसून कुरळप पोलिस ठाण्यात अज्ञात हल्लेखोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मृत इंदुबाई पाटील या कुरळप येथील बिरोबा मंदिराच्या शेजारी एकट्याच राहत होत्या. दि. ७ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्या ऐतवडे खुर्द गावच्या हद्दीत असणाऱ्या चांदोली वसाहतीमधील पवार मळा येथील महादेव पवार यांच्या उसाच्या शेतात शेळ्यांना चारा आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यानंतर त्या घराकडे परतल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा शोध सुरू होता. शुक्रवारी दि. ८ रोजी सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला.पवार मळा येथे शेळ्यांना चारा आणण्यास गेल्यानंतर अज्ञात हल्लेखोराने इंदुबाई पवार यांचे हात व तोंड बांधून त्यांच्या पोटावर विळ्याने वार करून खून केल्याचे दिसून आले. गावात माहिती पसरताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे तेथे गर्दी झाली होती. कुरळप पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.
मृत इंदुबाई पाटील या कुरळप येथे एकट्याच राहत होत्या. त्यांच्या खुनाचे नेमके कारण काय असू शकते? तसेच खून कोणी केला असावा? याचा कुरळप पोलिस तपास करत आहेत. इंदुबाई यांचा सावत्र मुलगा मारुती राजाराम पाटील यांनी फिर्याद दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक विक्रम पाटील हे तपास करीत आहेत.दरम्यान खुनाची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकानेदेखील कुरळप येथे येऊन माहिती घेतली. गुन्हे अन्वेषण आणि कुरळप पोलिसांचे पथक तपासात गुंतले आहे.
खुनाच्या कारणाचा शोधवृद्ध इंदुबाई पाटील या एकट्याच राहत होत्या. त्यांच्या खुनाचे नेमके कारण काय? याबाबत गावात चर्चा सुरू आहे. त्यांच्या खुनामागे नेमके कोण? याचा कुरळप पोलिस तपास करत आहे. त्यामुळे तपासाकडे लक्ष लागले आहे.