कुपवाड : सावळी (ता. मिरज) येथील तानंग रस्त्यालगत असलेल्या श्री निधी ॲग्रो प्रोसेसिंग ॲन्ड कोल्ड स्टोअरेजमधील बाॅयलरच्या स्फोटात नातूसिंग ग्यानसिंग भदोरीया (वय ५८, रा. मूळगाव बिहार, सध्या रा. सावळी) हा कामगार ठार झाला. या दुर्घटनेत कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. बाॅयलरच्या स्फोटाने सावळीतील दोन किलोमीटरचा परिसर हादरून गेला. या घटनेची कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सावळीमध्ये तानंग रस्त्यावर श्रीनिधी ॲग्रो प्रोसेसिंग ॲन्ड कोल्ड स्टोअरेज कार्यरत आहे. या कोल्ड स्टोअरेजमध्ये रविवारी दुपारी अचानक बाॅयलरचा स्फोट झाला. या स्फोटात बाॅयलरवरील कामगार नातूसिंग भदोरीया हा गंभीर जखमी झाला. बाॅयलरचे संपूर्ण शेड जमीनदोस्त झाले. शेडवरील पत्रे लांब उडून गेले. तर कोल्ड स्टोअरेजमधील काचेच्या खिडक्या, पत्रे, दरवाजाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. स्फोटात मृत झालेला कामगार नातूसिंग हा ठेकेदारामार्फत काम करीत असल्याचे समजले.नातूसिंग हा कोल्ड स्टोअरेजमधील एका खोलीत राहत होता. स्फोटात जखमी झाल्यानंतर त्याला इतरांनी तातडीने सांगलीतील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. या बाॅयलरच्या स्फोटाने सावळी गावासह परिसर हादरला होता. कोल्ड स्टोअरेजमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक विश्वजित गाडवे पोलिस पथकासह घटनास्थळी तातडीने दाखल झाले होते. रात्री उशिरापर्यंत कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
Sangli: सावळीत कोल्ड स्टोअरेजमध्ये स्फोटात कामगार ठार, दोन किलोमीटरपर्यंत हादरा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2023 11:35 AM