आटपाडी: मुलीचे लग्न तुझ्याशी लावून देतो असे सांगत एका कुटुंबाने तरुणाची फसवणूक करत तब्बल दहा लाखाहून अधिक रुपये उकाळल्याचा प्रकार आटपाडी तालुक्यात घडला. याबाबत अमर अप्पासो सूर्यवंशी (रा. खांजोडवादी) याने पोलिस ठाण्यात तरुणी व तिच्या कुटूंबियांच्या विरोधात तक्रार दिली आहे. याप्रकरणी दिघंचीच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.स्नेहा नानासो मोरे, अलका नानासो मोरे, अविनाश नानासो मोरे, नानासो अर्जुन मोरे (सर्व रा. घनचक्कर मळा, दिघंची), प्रतिभा संतोष जाधव (रा. महूद ता.सांगोला) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.याबाबत माहिती अशी की, १२ मार्च २०२२ ते २२ डिसेंबर २०२२ या कालावधीत स्नेहा मोरे हिचे अमर सूर्यवंशी यांच्याशी लग्न लावून देतो असे सांगत तरुणांचा विश्वास संपादन करत त्याच्याकडून विविध कारणासाठी वेळोवेळी 10 लाखाहून अधिक रक्कम व साहित्य मोरे कुटुंबीयांनी अमर सुर्यवंशी यांच्याकडून घेतले. स्नेहासह त्याने मोरे कुटूंबियांना अनेक वस्तू खरेदी करून दिल्या होत्या.अविनाश मोरे यास सोने, चांदीचे दुकान सुरू करण्यासाठी 18 लाखांची मागणी मोरे कुटूंबानी केली होती. पैसे न दिल्यास विवाह लावून देणार नसल्याची धमकी दिली होती. याबाबत कोणास सांगितल्यास आत्महत्या करण्याची धमकीही दिली. त्यामुळे अमर हैराण झाला होता. यानंतर त्याने अखेर आटपाडी पोलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी मोरे कुटुंबियाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल दादासाहेब ठोंबरे अधिक तपास करत आहेत.
Sangli Crime: मुलीचे लग्न तुझ्याशी लावून देतो असे सांगितले, अन् तरुणाला दहा लाखांना फसवले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2023 6:14 PM