दिलीप मोहितेविटा : भाळवणी (ता. खानापूर) परिसरात बिबट्या आल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करीत वनविभागाच्या पथकाला सुमारे १५ ते २० किमी रानोमाळ भटकंती करावी लागल्याचा प्रकार घडला. मात्र, तेथील तरुणाने बिबट्याचा दुसऱ्या ठिकाणचा फोटो व्हायरल करीत अफवा पसरविल्याची कबुली वन अधिकाऱ्यांना दिली. त्यामुळे या प्रकाराने नागरिकांसह वन विभागानेही सुटकेचा नि:श्वास सोडला. अखेर त्या तरुणाने हा प्रकार खोटा असल्याचे सांगत पथकातील अधिकाऱ्यांची माफी मागितली.गेल्या दहा ते पंधरा दिवसांपूर्वी भाळवणी परिसरात बिबट्यासदृश प्राणी दिसल्याची चर्चा सुरू झाली. याची माहिती वन विभागाचे वनक्षेत्रपाल अरविंद कांबळे, वनरक्षक रजनीकांत दरेकर यांना मिळाल्यानंतर त्यांनी तपासासाठी पथक पाठविले. त्या वेळी ज्या ठिकाणी बिबट्या दिसला त्या ठिकाणापासून वन विभागाने शोध सुरू केला. परंतु, त्याबाबतचे कोणतेही ठसे दिसून आले नाहीत. त्यानंतर गेल्या चार दिवसांपूर्वी शेतात एका कुत्र्यावर हल्ला करून त्याला फाडल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतरही वन विभागाने तपासणी केली. परंतु, बिबट्याच्या हल्ल्यात कुत्र्याचा मृत्यू झाला नसून तरसाने कुत्र्यावर हल्ला केल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.त्याच दिवशी सकाळी भाळवणी येथील रामचंद्र मोहिते या तरुणाने एक बिबट्या उसाच्या शेताजवळ बसल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यामुळे वन विभागाच्या पथकासह आळसंदचे अजित जाधव, विवेक भिंगारदेवे, पोलिस पाटील गणेश शेटे यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तिसऱ्यांदा शोधमोहीम हाती घेतली. त्यावेळी बिबट्याचा फोटो काढणाऱ्या रामचंद्र मोहिते यालाही सोबत घेतले.या वेळी मोहिते याने पथकाला रात्रीच्या वेळी भाळवणी परिसरात तब्बल १५ ते २० किमी पायपीट करायला लावली. परंतु, बिबट्याचा ठावठिकाणा अथवा बिबट्या असल्याचा कोणताही पुरावा हाती लागला नाही. वनविभागाने मोहिते याची उलटतपासणी सुरू केली. कायद्याचा धाक दाखवत त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली असता रामचंद्र मोहिते याचा बनाव उघड झाला.नागरिकांनी सतर्क राहावे...भाळवणी परिसरात बिबट्या आल्याचा बनाव उघडकीस आला असला तरी नागरिकांनी यापुढे सतर्क राहावे, असे आवाहन वन विभागाचे वनक्षेत्रपाल अरविंद कांबळे यांनी केले आहे.
बिबट्या आला रे आला..., सांगलीतील भाळवणीच्या तरुणाने सिनेस्टाइलने केली वनविभागाची दमछाक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 1:21 PM