सांगली : लष्करात नोकरी लावण्याच्या आमिषाने बेडग (ता. मिरज) येथील बाळू मारुती लवटे (वय २०) या तरुणाला चार लाख ६० हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी प्रमोद कृष्णा शिंगाडे (रा. बेडग), संदीप लक्ष्मण फाटक (रा. चंदगड, जि. कोल्हापूर) व अक्षय जाधव (रा. कोल्हापूर) यांच्याविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.बेडग येथील बाळू लवटे सैन्यात भरती होण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करीत आहे. यातून त्याची प्रमोद शिंगाडे व संदीप फाटक यांच्याशी ओळख झाली. कोल्हापूर जिह्यातील मित्रांमार्फत लष्करात नोकरी लावतो, त्यासाठी पाच लाख रुपये द्यावे लागतील, असे शिंगाडे व फाटक यांनी त्याला सांगितले.त्यानंतर दोघांनी बाळू लवटे याच्या मोबाईलवर मेल पाठवून लष्करात नोकरी लावण्याची हमी दिली. सैन्याच्या नावाने बनावट सही-शिक्का असलेले नोकरीचे पत्रही बाळू लवटे याला पाठविले. त्या बदल्यात लवटे याने आईच्या बँक खात्यावरुन एकदा तीन लाख ४६ हजार, नंतर ४९ हजार रुपये व पुन्हा ६५ हजार असे चार लाख ६० हजार रुपये पाठविले.मात्र, पैसे दिल्यानंतरही सैन्यात नोकरी मिळाली नसल्याने त्याने तिघांकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र त्यांनी टोलवाटोलवी केली. अखेर लवटे याने मंगळवारी सकाळी मिरज ग्रामीण पोलिसात तिघांविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली.
लष्करात नोकरीच्या आमिषाने साडेचार लाखांचा गंडा, सैन्याच्या नावाने बनावट सही-शिक्क्याचे पत्रही पाठविले
By श्रीनिवास नागे | Published: October 11, 2022 12:54 PM