सांगली : बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी सचिन बाबासाहेब कांबळे (वय २७, रा. रमामाता नगर, आंबेडकरनगर, रुकडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) याला पाच वर्षे सश्रम कारावास व ५००० रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. दंड न भरल्यास आणखी १५ दिवस साधी कैद सुनावण्यात आली. सांगली येथील तदर्थ सह जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. पोतदार यांनी हा निकाल दिला. या गुन्ह्यातील आणखी एक आरोपी अण्णा ऊर्फ समीर ऊर्फ मानसिंग यशवंत सावंत फरारी आहे. तर आरोपी मनोहरलाल गोधेजा, विनायक कुंभार, रायाप्पा गडकरी, सुहास जाधव ऊर्फ युवराज पाटील हे चौघेजण खटला चालू असताना मयत झालेले आहेत.खटल्याची माहिती अशी : १७ सप्टेंबर २०१३ रोजी सकाळी सव्वाआठ वाजता सांगली एसटी स्थानकाच्या गेटजवळ आरोपी सचिन बाबासाहेब कांबळे ५०० रुपये मुल्याच्या बनावट नोटा खपविण्यासाठी आला होता. त्यासाठी त्याने ५०० रुपयांच्या २४ बनावट नोटा गांधीनगर (कोल्हापूर) येथील बबलू ऊर्फ हरेश यांच्याकडून आणल्या होत्या. सांगली शहरात त्या खपविण्याचा त्याचा प्रयत्न होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला बनावट नोटांसह ताब्यात घेतले. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरिक्षक के. जी. घाडगे यांनी केला. तपासाअंती जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे दोन साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकिलांनी सांगितले की, हा गुन्हा समाज विरोधी असून अनेक सर्वसामान्य लोकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शिक्षा दिली जावी. गुन्हा शाबित झाल्याने कांबळे याला शिक्षा सुनावण्यात आली. अन्य आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.गुन्ह्याच्या तपासकामी कॉन्स्टेबल प्रकाश डांगे, शशिकांत कलकुटगी, सीमा धनवडे, स्वप्ना गराडे यांनी मदत केली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकिल ॲड. व्ही. एम. देशपांडे यांनी काम पाहिले.
बनावट नोटा बाळगणाऱ्या रुकडीतील तरुणास पाच वर्षे कारावास, सांगली जिल्हा न्यायालयाने सुनावली शिक्षा
By संतोष भिसे | Published: February 06, 2024 4:58 PM