अथणी : दाेन हजाराच्या नोटा बदलून देण्याच्या आमिषाने चाैघांच्या टाेळीने कर्नाटकातील मंगसुळी येथे बाेलावून घेत सावर्डे (ता. तासगाव) येथील समीर भानुदास भोसले यांना सहा लाखांचा गंडा घातला. खंडाेबा देवस्थान परिसरात माेटारीत पैसे घेतल्यानंतर पोलिस आल्याची बतावणी करत भाेसले यांना पळवून लावले. या टाेळीत सांगलीपोलिस दलातील शिपाई सागर जाधव याचा समावेश असून, कागवाड पाेलिसांनी त्याच्यासह तिघांना अटक केली, तर मुख्य सूत्रधार फरारी आहे. गुरुवार, १ जून राेजी हा प्रकार घडला.कऱ्हाड (जि. सातारा) येथील एका कंपनीमध्ये काम करणाऱ्या समीर भोसले यांच्याशी अज्ञाताने माेबाइलवर संपर्क साधला. दाेन हजाराच्या सहा लाख रुपयांच्या नाेटा द्या आणि त्या बदल्यात पाचशेच्या नाेटांमध्ये पाच लाख रुपये घ्या, असे आमिष त्याने दाखवले. त्यांना मंगसुळी येथील खंडोबा मंदिराच्या परिसरामध्ये बाेलावून घेतले. तेथे तिघांनी मोटारीत भाेसले यांच्याकडून दाेन हजार रुपयांच्या सहा लाखाच्या नाेटा घेतल्या. त्यानंतर पाचशे रुपयांच्या नाेटा देत असताना माेटारीच्या मागे दुचाकीवरून एकजण आला. त्याला पाहून पोलिस आल्याची बतावणी करत संशयितांनी भाेसले यांना पळवून लावले आणि तेथून पोबारा केला.
भोसले यांनी या प्रकाराची माहिती कागवाड पोलिसांना दिली. पोलिसांनी सापळा रचून सांगली पोलिस दलातील शिपाई सागर जाधव याच्यासह आरिफ सागर, लक्ष्मण नाईक या तिघांना अटक केली. मुख्य संशयित फरार झाला. संशयितांकडे पाचशेच्या दहा खऱ्या नाेटा आढळल्या, तर इतर नोटा बनावट हाेत्या. लहान मुलांच्या खेळासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’ असे लिहिलेल्या पाचशेच्या नाेटांचे १२७ बंडल मिळून आले. ते सर्व कागवाड पोलिसांनी जप्त केले. तिघा संशयितांना अटक करून माेटार व दुचाकी जप्त केली.
बदली तासगावला, पण हजर नाही झाला!या प्रकरणामध्ये सांगली पोलिस दलात कार्यरत सागर जाधव (रा. कवठेमहांकाळ) या पोलिस शिपायाच्या सहभागामुळे खळबळ उडाली आहे. जाधव मिरज शहर पोलिस ठाण्यात कार्यरत हाेता. त्याची तासगाव पोलिस ठाण्याकडे बदली झाली आहे. मात्र बदलीच्या ठिकाणी ताे हजर झाला नव्हता. गुरुवारी ताे मंगसुळीतील फसवणूक प्रकरणात सापडल्यानंतर कर्नाटक पाेलिसांनी सांगलीचे पाेलिस प्रमुख डॉ. बसवराज तेली यांना घटनेची माहिती दिली. डॉ. तेली यांनी रीतसर कारवाईच्या सूचना दिल्यानंतर जाधवसह तिघांवरही गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करण्यात आली.