सांगली: शहरातील गोकुळनगर येथे तरुणाचा धारदार शस्त्राने पाठीत वार करून खून करण्यात आला. प्रेमसंबंधातून एकावर खूनाच्या उद्देशाने हल्ला करण्यात येत असतानाच, मध्यस्थी करणाऱ्यावरही हल्ला करण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाला. विनोद किसन इंगळे (वय २८ रा. संजय गांधी झोपडपट्टी, गोकुळनगर, सांगली) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे तर हणमंत गोल्हार हा या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे.
पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत सराईत गुन्हेगार लखन इसर्डे, गजानन इसरडे, राकेश उर्फ राक्या कांबळे यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
घटनेची अधिक माहिती अशी की, मृत विनोद हा गोकुळनगर परिसरातील संजयगांधी झोपडपट्टी येथे राहण्यास होता. विनोद आणि त्याचा मित्र हणमंत गोल्हार दोघे रात्रीच्या सुमारास गोकुळनगर येथील गल्ली नंबर एक येथे चौकात गप्पा मारत उभे होते. यावेळी त्याच परिसरात राहणारे संशयित लखन इसर्डे, गजानन इसर्डे, राकेश कांबळे व त्यांच्या तीन ते चार साथीदारांसह आले.
प्रेमसंबंधाच्या कारणातून लखन इसरडे याने संशय घेवून जखमी हणमंत गोल्हार याचा खून करण्याच्या उद्देशाने त्याच्यावर कोयत्याने वार केला. यावेळी इंगळे हा मध्यस्तीसाठी गेला असता चाकूने त्याच्या मांडीवर, पाठीत कोयत्याने वार करण्यात आले. हल्ला झाल्यानंतर दोघांनाही परिसरातील नागरिकांनी उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल केले. रूग्णालयात डॉक्टरांनी विनोद हा यापूर्वीच मृत झाल्याचे सांगितले. उत्तरीय तपासणीनंतर करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. यावेळी रूग्णालयात नातेवाईकांसह विनोदच्या मित्रांनी मोठी गर्दी केली होती.
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, विश्रामबागचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानेही याचा तपास करत यातील संशयितांपैकी तिघांना रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे.