सांगली : धक्का लागल्याच्या किरकोळ कारणातून सांगलीत एका तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. खुनाचा प्रकार सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास मंगळवार बाजाराजवळ घडला. मंगळवारी सकाळी तो उघडकीस आला. संजयनगर पोलिसांनी तपासमोहीम गतिमान करत तिघा संशयितांच्या मुसक्या आवळल्या.मयूरेश यशवंत चव्हाण (वय ३०, रा. बोळाज प्लॉट, शांतिनिकेतनजवळ, सांगली) असे मृताचे नाव आहे. प्रतीक रामचंद्र शितोळे (२३, रा. जुना कुपवाड रस्ता, पाण्याच्या टाकीजवळ, शामनगर, सांगली), गणेश जोतीराम खोत (३०), सिद्धनाथ राजाराम लवटे (दोघेही रा. माळी गल्ली क्रमांक १, माळी वस्ती, संजयनगर, सांगली) अशी संशयितांची नावे आहेत. यांपैकी लवटे हा इरळी (ता. कवठेमहांकाळ) या मूळ गावचा आहे.संजयनगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी : सोमवारी रात्री मयूरेश दारू पिण्यासाठी उत्तर शिवाजीनगरमध्ये कुरणे चौकात मुन्ना कुरणे यांच्या दुकानात गेला होता. तेथे त्याची किरकोळ कारणावरून तिघा तरुणांशी बाचाबाची झाली. त्यावेळी मयूरेशने तिघांकडे रागाने पाहिले. शिवीगाळही केली. त्यानंतर चौघेही मंगळवार बाजार ते अभयनगर रस्त्यावर गेले. तेथे मस्जिदीच्या मागील बाजूस त्यांच्यात पुन्हा वाद पेटला. तिघा संशयितांनी मयूरेशवर हल्ला केला. खाली पाडून त्याच्या डोक्यात दगड घातला. त्यातच मयूरेश गतप्राण झाला. तो मृत झाल्याचे पाहून तिघे तेथून निघून गेले.
मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास मंगळवार मस्जिदीच्या मागे अज्ञात तरुणाचा मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मृतदेहाजवळ एक मोठा दगड व दुचाकीही होती. हा खुनाचा प्रकार असल्याचे प्रथमदर्शनीच स्पष्ट झाले. पोलिस उपअधीक्षक प्रणील गिल्डा, संजयनगरचे निरीक्षक बयाजीराव कुरळे यांनी सहकाऱ्यांसह त्वरित घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथकानेही माग काढण्याचा प्रयत्न केला.चौकशीअंती सोमवारी रात्री मयूरेश आणि तिघा तरुणांचे दारू दुकानासमोर भांडण झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने हालचाली करीत तिघांची नावे निष्पन्न केली. दुपारी तीनच्या सुमारास त्यांना ताब्यात घेतले. माळी गल्ली आणि शरदनगरमध्ये त्यांना अटक केली. मृतदेह सापडल्यापासून सहा-सात तासांतच आरोपींना गजाआड केले.खुनासंदर्भात मयूरेशचे मामा हणमंत रामचंद्र शिंदे (४३, रा. बोळाज प्लॉट, शांतिनिकेतनजवळ, सांगली) यांनी संजयनगर पोलिसांत फिर्याद दिली. तपासात पोलिस कर्मचारी सूरज सदामते, विनोद साळुंखे, नवनाथ देवकाते, अशोक लोहार, दीपक लोंढे, सुशांत गायकवाड यांनी भाग घेतला.
दोघे अविवाहित, दोघे पत्नीशिवायघटनेतील दोघे तरुण अविवाहित आहेत, तर दोघांची पत्नी त्यांना सोडून गेली आहे. मृत मयूरेश याचे लग्न झालेले नाही. संशयित सिद्धनाथ लवटे हादेखील अविवाहित आहे. अन्य संशयित गणेश खोत व प्रतीक शितोळे यांच्या पत्नी त्यांच्याजवळ सध्या नसल्याचे संजयनगर पोलिसांनी सांगितले. तिघेही संशयित तरुण मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात.
दारूच्या नशेने केला घातमृत मयूरेश आणि तिघा संशयितांमध्ये कोणतेही पूर्ववैमनस्य नसल्याचे तपासात स्पष्ट झाले. चौघेही याच दारूच्या दुकानात अधूनमधून दारू प्यायला यायचे. तेथेच त्यांची ओझरती ओळख झाली होती; पण त्यांच्यात खुन्नस निर्माण व्हावी, अशी कोणतीही घटना याअगोदर घडलेली नाही. त्यामुळेच बाचाबाची झाल्यानंतरही एक संशयित खुद्द मयूरेशच्याच दुचाकीवर मागे बसून त्याच्यासोबत गेला होता. पण दारूच्या नशेत आपण काय करतो याचे भान त्यांना राहिले नाही. चौघेही दोन दुचाकींवरून एकत्र गेल्यानंतर मस्जिदीमागील रस्त्यावर त्यांच्यात पुन्हा बाचाबाची झाली आणि तिघांनी मयूरेशच्या डोक्यात दगड घातला.
मयूरेश सांगलीत मामाकडे राहण्यासमयूरेशचे मूळ गाव भेंडवडे (जि. कोल्हापूर) असले, तरी काही वर्षांपासून तो सांगलीत मामाकडे राहण्यास आला होता. एका नेत्र रुग्णालयात नोकरी करत होता. गावाकडे आई, वडील, बहीण असा परिवार आहे. गावात त्याने काही दिवस खासगी बॅंकेत एजंट स्वरूपात काम केले होते. त्याला दारूचे व्यसन होते असे पोलिसांनी सांगितले. खून झाला, तेव्हादेखील त्याने मद्यप्राशन केले होते.