मिरज : टाकळी (ता. मिरज) येथे अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी पोलीस चौकशीसाठी गेल्यानंतर अपहृत मुलीच्या मैत्रिणीने पोलिसांसमोरच कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ग्रामीण पोलिसांच्या पथकाने तातडीने पोलीस वाहनातून तरुणीस मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.मिरज पूर्व भागातील बेडग येथील बारावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला मंगळवारी मध्यरात्री एका विवाहित तरुणाने फूस लावून पळवून नेल्याचा संशय आहे. याबाबत मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली असून, ग्रामीण पोलिसांत मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी संबंधित मुलीच्या मैत्रिणी व नातेवाइकांकडे चौकशी केली असता मुलगी सापडली नाही.अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्यासाठी संबंधित मुलीसोबत महाविद्यालयात शिकणाऱ्या मैत्रिणीने मदत केल्याचा संशय असल्याने मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक रणदिवे, हवालदार संभाजी पवार, महिला पोलीस कर्मचारी शबाना शेख यांचे पथक मंगळवारी सायंकाळी टाकळीत मैत्रिणीकडे चौकशीसाठी गेले होते. यावेळी या मुलीने पोलिसांसमोरच घरातील कीटकनाशक प्राशन केले. त्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली. पोलिसांनी तरुणीला पोलीस वाहनातून मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मुलीच्या प्रकृतीचा धोका टळला आहे. या घटनेमुळे पोलिसांची धावपळ उडाली होती.
पोलिसांसमोरच विष प्राशन करून तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न, टाकळीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 1:27 PM