कोकरुड : रांगणा (ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) किल्ल्यावरुन शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. ओमकार भिमराव पाटील (वय १९) असे या मृत तरुणाचे नाव आहे. पणूब्रे वारुण (ता.शिराळा) येथील युवकांच्या सोबत शिवज्योत आणण्यासाठी ओमकार रांगणा किल्ल्यावर आला होता. या घटनेची नोंद भुदरगड पोलिसात दाखल करण्यात आली आहे.भुदरगड पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी की, पणूब्रे वारुण ता. शिराळा येथील अंदाजे ३० ते ४० जण १९ फेब्रुवारीला होणाऱ्या शिवजयंती निमित्त शिवज्योत आणण्यासाठी बुधवारी रांगणा किल्ल्यावर आले होते. गुरुवारी किल्ल्यावरील परिसरासह तलावाची स्वच्छता करताना ओमकार अचानक बुडून बेपत्ता झाला. त्याचा शोध घेण्यासाठी कोल्हापूर येथील आपत्कालीन व्यवस्थापणाच्या गुरुवार सकाळ पासून शोध सुरु होता.आक्स लाईट किल्ल्यावर चढवत मोटार बोटीच्या शोध सुरु केला होता. अखेर शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. गारगोटी येथेच त्याचे श्ववविच्छेदन करण्यात आले.ओमकार हा सोनवडे येथे महाविद्यालयात शिकत असून तो एकुलता मुलगा होता. शाळा शिकत शिकत त्याने २५-३० शेळी पालन प्रकल्प सुरु केला होता. वडील ग्रामपंचायत कर्मचारी आहेत. भुदरगड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी सहकाऱ्यांसह सलग दोन दिवस शोध मोहीम सुरु ठेवली होती. सामाजिक कार्यात सहभागी असणाऱ्या ओमकारच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू, रांगणा किल्ल्यावरील घटना; मृत तरुण शिराळ्यातील
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 2:26 PM