सांगली / कुंडल : घोगाव (ता. पलूस) येथील रेल्वे फाटकाजवळ मृतावस्थेत आढळून आलेल्या तरुणाचा आर्थिक देवघेवीच्या वादातून खून झाल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. संतोष उमेश गाडवे (वय ४२, रा. कवठेपिरान, ता. मिरज) असे मृताचे नाव असून, श्रीहरी रवींद्र वडगावे (२२, रा. पेठभाग, कवठेपिरान) या संशयिताला अवघ्या चार तासांत गुन्ह्याचा तपास करत वडगावे याला जेरबंद केले.मंगळवार, दि. २४ रोजी रात्री पावणेअकराच्यासुमारास घोगाव येथील रेल्वे फाटकासमोर पिकअप शेडमध्ये तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. डोक्याला गंभीर जखम झालेल्या स्थितीत मृतदेह आढळल्याने संशय बळावला होता. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अप्पर अधीक्षक आंचल दलाल यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. एलसीबीच्या पथकाला मृतदेह आढळलेल्या ठिकाणापासून जवळच एक दुचाकी बेवारस स्थितीत आढळून आली. या दुचाकीची माहिती घेतली असता, ती कवठेपिरान येथील संतोष गाडवे याची असल्याचे समोर आले. गाडवेबाबत अधिक माहिती पोलिसांनी घेतली, त्यात संतोष गाडवे व त्याचा मित्र श्रीहरी वडगावे हे दोघे सकाळपासून गावातून कोठेतरी गेल्याचे समजले. वडगावे हा कवठेपिरान येथील घरात असल्याचे पोलिसांना समजले. त्याला ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीत सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर एलसीबीच्या पथकाने केलेल्या कौशल्यपूर्ण तपासात त्याने खुनाची कबुली दिली. एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चेतन महाजन, संदीप नलवडे, सुनील जाधव, सागर टिंगरे, हेमंत ओमासे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
आर्थिक देवघेवीच्या वादातून तरुणाचा खून, सांगलीतील घोगाव येथे आढळला होता मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 5:27 PM