सांगली : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कुपवाड येथे सापळा रचून परप्रांतीय दुचाकी चोरट्याला अटक केली. त्याच्याकडून एक मोटारसायकल जप्त करण्यात आली. रंजन महेश सिंग (वय २१, सध्या रा. बामनोली, ता. मिरज, मुळ रा. खलपूरा, जि. छपरा , बिहार) असे संशयिताचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, पोलिस अधिक्षक दीक्षीत गेडाम यांनी मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिले होते.
पोलिसांनी दिलेल्या आदेशानुसार कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एलसीबीचे पथक पेट्रोलिंग करीत असताना हवालदार विकास भोसले व शशिकांत जाधव यांना रंजन सिंग हा चोरीतील मोटारसायकल विक्रीसाठी कुपवाडमधील थोरला गणपती चौकात थांबला असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकाने धाव घेत त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील मोटारसायकलबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिले. उपनिरीक्षक विशाल येळेकर यांनी त्याची विचारपूस केली असता बामणोली जिल्हा परिषद शाळेजवळून आठवडा बाजारातून मोटारसायकल चोरल्याची त्याने कबुली दिली आहे. अधिक तपासासाठी त्याला कुपवाड एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.