आष्टा : येथील नागाव रस्त्यावर अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरुणाला फरफटत नेऊन बेदम मारहाण करीत त्याचा गळा आवळून खून करण्यात आला. शिवाजी अप्पा कुलाळ (वय ३५, रा. रामनगर, आष्टा, मूळ गाव सोन्याळ, सरगरवस्ती, ता. जत) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली. याप्रकरणी संशयित नवनाथ विठ्ठल ऐवळे (३५, रा. रामनगर, आष्टा) याला आष्टा पाेलिसांनी अटक केली आहे.शिवाजी कुलाळ याचा उसाचे वाडे खरेदी-विक्रीचा व्यवसाय हाेता. गेल्या काही वर्षांपासून कुटुंबासह आष्ट्यातील रामनगर परिसरात राहत हाेता. काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी गावी गेली आहे. व्यवसायानिमित्त त्याची नवनाथ एवळे याच्याशी ओळख हाेती. यादरम्यान नवनाथच्या नात्यातील एका विवाहितेशी त्याचे अनैतिक संबंध जुळलेे. याबाबत संशय येताच नवनाथने त्याला अनेकदा समजावून सांगितले होते, तरीही त्याच्यामध्ये सुधारणा हाेत नव्हती. यामुळे नवनाथ संतापला हाेता.मंगळवारी रात्री त्याने एका अल्पवयीन संशयिताच्या मदतीने शिवाजीला दूरध्वनीवरून नागाव रस्ता परिसरात बोलावून घेतले. रस्त्याकडेच्या माळावर शिवाजीला फरफटत नेऊन बेदम मारहाण केली. शेवटी गळा आवळून त्याचा खून केला.बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. आष्टा पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या खुनाबाबत शिवाजी याचा भाऊ विलास अप्पा कुलाळ याने फिर्याद दिली आहे. दरम्यान, आष्टा पोलिसांनी संशयित नवनाथ ऐवळे याला अटक केली आहे. सहायक निरीक्षक मनमित राऊत, महेश गायकवाड, सहायक उपनिरीक्षक संजय सनदी, राजेंद्र पाटील, अवधूत भाट, अभिजित धनगर, नितीन पाटील, प्रवीण ठेपने, योगेश जाधव, अमोल शिंदे, सूरज थोरात, अभिजित नायकवडी यांनी या प्रकरणाचा तपास केला.पंधरा दिवसांत दुसरा खून, शहरात खळबळआष्टा येथे २७ फेब्रुवारी रोजी ओंकार रकटे या तरुणाचे माेटारीतून अपहरण करून तिघांनी गळा आवळून खून केला हाेता. खुनानंतर ओंकारच्या मृतदेहावर आष्ट्यातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करून राखेचीही विल्हेवाट लावली. यापाठोपाठ पंधरवड्यात दुसरा खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
अनैतिक संबंधाचा संशय, बेदम मारहाण करीत गळा आवळून तरुणाचा केला खून; सांगलीतील आष्टा येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2023 1:21 PM