सांगली : इनामधामणी (ता. मिरज ) येथील ऐश्वर्या मॅरेज हॉल येथे स्वयंपाक कामासाठी गेलेल्या महाविद्यालयीन युवकाच्या अंगावर भिंत कोसळून तो जागीच ठार झाला. एका महिलेसह चौघेजण जखमी झाले. सायंकाळी साडेपाचला ही घटना घडली.आदित्य कपूर कोळी (वय १७ रा. उमळवाड, जि. कोल्हापूर) असे मृत युवकाचे नाव आहे. कल्पना पंत (वय ३५), सुरज सिंग (वय २४), लक्ष्मण श्रीकांत वरगंटे (वय २३), साहिल नंदीवाले (वय २५, सर्व रा. जयसिंगपूर) अशी जखमींची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच मृत आदित्यचे नातेवाईक आणि मित्रांनी शासकीय रुग्णालयात धाव घेत आक्रोश केला.इनामधामणी येथे ऐश्वर्या मॅरेज हॉलमध्ये आज एक समारंभ होता. केटरिंगसह अन्य कामासाठी जयसिंगपूर, उमळवाड परिसरातील युवक आणि महिला आल्या होत्या. सायंकाळी समारंभानंतर जेवणाची भांडी ठेवण्याचे काम सुरू होते. पाचच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाने हजेरी लावली. आदित्यसह सारेजण हॉलजवळील एका खोलीजवळ थांबले होते. जोरदार वारा आणि पावसामुळे एका बाजूची भिंत कोसळली. त्यात आदित्य सापडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. इतरांना डोक्याला, पायाला, छातीला, पाठीला गंभीर स्वरूपाचा मार मारला.जखमींना सांगलीत शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. आदित्य यालाही आणले. त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर जखमींवर तातडीने अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले. घटनेची माहिती जयसिंगपूरसह उमळवाड परिसरात समजल्यानंतर नातेवाईक, मित्रमंडळींनी एकच गर्दी केली.
आदित्यला ‘आयपीएस’ व्हायचे होते.त्याची परिस्थिती हलाखीची आहे. वडील सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. आदित्य हुशार विद्यार्थी होता. विज्ञान शाखेचे शिक्षण पूर्ण करत कुटुंबाला हातभार लावत होता.