सांगली : कडेगाव एमआयडीसी परिसरात दोन पिस्तुले विक्रीच्या तयारीत असलेल्या संशयितास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. सुरज जगन्नाथ मोहिते (वय २१, रा. सोहोली ता. कडेगाव) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून दोन पिस्तूल, जिवंत काडतुसे असा एक लाख एक हजार ७२० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.जिल्ह्यात अवैधरित्या शस्त्रांची तस्करी करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे पथक गस्तीवर असताना, त्यांना माहिती मिळाली की, संशयित मोहिते हा कडेगाव एमआयडीसी परिसरात दोन पिस्तूल घेऊन विक्रीच्या तयारीने आला आहे. कऱ्हाड रोडवर त्याला पथकाने शिताफीने पकडून त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्या कमरेला खोचलेली दोन पिस्तुले मिळून आली. त्याच्याकडून एक लाख रुपये किंमतीचे पिस्तुले, दिड हजारांची जिवंत काडतुसे आणि रोकड असा माल जप्त करण्यात आला.एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, कुमार पाटील, विक्रम खोत, सागर लवटे, दरीबा बंडगर, सागर टिंगरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
Sangli: अवैधरित्या पिस्तुल विक्री करणारा संशयित कडेगावात जेरबंद; दोन पिस्तुल जप्त
By शरद जाधव | Published: July 14, 2023 6:49 PM