सांगली : आयुक्त अजिज कारचे यांच्या अनुपस्थितीत गेले दोन दिवस महापालिकेत सावळागोंधळ सुरू झाला आहे. प्रशासन अधिकाऱ्यांनी अचानकपणे केलेल्या तपासणीत तब्बल सात अधिकाऱ्यांसह ३९ कर्मचारी गैरहजर होते. हालचाल रजिस्टरला कोणतीही नोंद न करता हे अधिकारी भटकंती करीत होते. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांचा एक दिवसाच्या पगार कपातीची कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. महापालिका आयुक्त सोमवारपासून रजेवर गेले आहेत. त्यांच्या अनुपस्थितीचा फायदा घेत महापालिकेतील अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आॅन ड्युटी भटकंती सुरू केली. अनेक कार्यालये ओस पडली. बायोमेट्रिक हजेरीचे यंत्रही बंद असल्याने त्याचा गैरफायदा घेण्यास सुरुवात झाली. तरीही हालचाल रजिस्टरला नोंदी न करताच अनेकांनी कार्यालय सोडले होते. त्यामुळेच महापालिकेचे प्रशासन अधिकारी तथा सहायक आयुक्त रमेश वाघमारे यांनी मंगळवारी महापालिकेच्या सर्व विभागांना अचानक भेट दिली. एका दिवसात तब्बल ३९ अधिकारी, कर्मचारी त्यांना गैरहजर आढळून आले. हालचाल रजिस्टरला कोणतीही नोंद न करता यातील बहुतांश अधिकारी, कर्मचारी कार्यालय सोडून फिरत होते. प्रशासन अधिकाऱ्यांनी तात्काळ त्यांना नोटिसा काढून चोवीस तासाच्या आत खुलासा करण्यास सांगितले. हालचाल रजिस्टरला ज्यांनी नोंदी केल्या नाहीत, अशा सर्व कर्मचाऱ्यांचे, अधिकाऱ्यांचे म्हणणेही फेटाळण्यात येणार असून, एक दिवसाचा पगार कपात केला जाणार आहे, असे वाघमारे यांनी सांगितले. या कारवाईमुळे महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. आयुक्तांच्या अनुपस्थितीचा गैरफायदा घेण्याच्या प्रकाराला यामुळे चाप बसला आहे. येत्या दोन दिवसात संबंधितांवर कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले.लिपिकाला टेबल सोडताना हालचाल रजिस्टरला नोंद करावी लागते. नागरिकांना बऱ्याचदा लिपिक टेबलला सापडत नाहीत. त्याची प्रचिती आज प्रशासन अधिकाऱ्यांनाही आली. दुपारी साडेतीन ते साडेचार या वेळेत महापालिकेतील तब्बल १६ लिपिक जागेवर नव्हते. लिपिकांनी आॅन ड्युटी भटकंती करण्याचे काहीच कारण नाही. तरीही महापालिकेत नेहमीच हा प्रकार सुरू असल्याचे दिसून येते. (प्रतिनिधी)गैरहजर महत्त्वाचे अधिकारीडॉ. रोहिणी कुलकर्णी (वैद्यकीय अधिकारी)ए. एच. दीक्षित (नगर अभियंता)आर. पी. जाधव (नगर अभियंता)के. सी. हळिंगळे (कामगार अधिकारी)शिवाजी कांबळे (ग्रंथपाल)अमर चव्हाण (विद्युत अभियंता)
‘आॅन ड्युटी’ अधिकारी, कर्मचाऱ्यांची भटकंती
By admin | Published: January 06, 2015 11:25 PM