संजयकुमार चव्हाण ।मांजर्डे : टाकाऊ प्लास्टिकचा वापर करून आरवडे (ता. तासगाव) येथे बंधारा साकारण्यात येत आहे. या बंधाऱ्यामुळे प्लास्टिक निर्मूलनासह जलसंधारण अशा दोन्ही गोष्टी साध्य होत आहेत. टाकाऊ प्लास्टिकपासून तयार होणारा हा पहिला बंधारा आहे. खुजगाव (ता. तासगाव) येथील आणि सध्या भारतीय सैन्यात जम्मू-काश्मीर येथे सेवेत असणा-या सचिन देशमुख या तरुणाने पर्यावरण संरक्षणासाठी हा उपक्रम सुरू केला आहे.
टाकाऊ प्लास्टिकपासून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी आजपर्यंत अनेक उपाय सुचविण्यात आले. पण त्यांचा फारसा लाभ झाला नाही. हे प्रदूषण रोखण्यासाठी सचिन देशमुख या जवानाने प्लास्टिक बंधारा हा पर्याय शोधला आहे. हा बंधारा तयार करण्यासाठी सुमारे पाच लाख रुपये खर्च होतो. महिन्यात तो बांधून तयार होऊ शकतो. यामुळे १७ ते २० टन प्लास्टिकचे निर्मूलन होते. एका बंधा-यामुळे १५ लाख लिटरपेक्षा जास्त पाणीसाठा होऊ शकतो.
ग्रामीण भागात ५० फूट रुंदीपर्यंत असणा-या ओढ्या-नाल्यावर प्लास्टिक बंधारे तयार करता येतील. ३६ फूट लांब व ८ फूट रुंद व ७ फूट उंच बंधारा बांधून त्यामध्ये जमा केलेले प्लास्टिक कायमस्वरूपी टाकले जाते. सभोवताली सिमेंटची तीन इंच भिंत तयार करण्यात येते. त्यामधील मोकळ्या जागेत तीन स्तर करून प्लास्टिक टाकले जाते. हा प्रयोग आरवडे येथे लोकवर्गणीतून सुरू आहे.प्लास्टिक बंधा-याला पेटंट मिळविले : सचिन देशमुख‘वेस्ट प्रॉडक्ट मशीन’ व ‘प्लास्टिक डॅम तंत्रज्ञान’ याचा वापर करून प्लास्टिक प्रदूषणाच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधला आहे. तयार होणाºया बंधा-यामुळे प्लास्टिक निर्मूलनाकडून जलसंधारणाकडे जाता येते. एक वर्ष संशोधन करून शोधलेल्या प्लास्टिक बंधा-याला पेटंट मिळविले आहे, असे सचिन देशमुख यांनी सांगितले.
लष्करात सेवा :सचिन देशमुख खुजगाव (ता. तासगाव) येथील रहिवासी आहेत. ते भारतीय लष्करात उधमपूर येथे सेवेत आहेत. इंडियन आर्मीच्या सिग्नल कोअरमध्ये ते गेल्या नऊ वर्षापासून सेवा बजावत आहेत. बारावी शिक्षण झाल्यानंतर ते लष्करात भरती झाले. त्यांनी डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा अभ्यासक्रम पूर्ण केला. २०१४ मध्ये त्यांनी प्लास्टिकवर संशोधनाचा विचार केला. तेव्हापासून त्यांनी प्लास्टिकचा प्रदूषणविरहित वापर करून वेगळा शोध लावण्याचा प्रयत्न केला. त्यातून या बंधा-याची संकल्पना सत्यात उतरली.