अविनाश बाड ।लोकमत न्यूज नेटवर्कआटपाडी : स्थळ... आटपाडी ते दिघंची राज्यमार्गावरील शेरेवाडी येथील राम रहीमचा डेरा सच्चा सौदा आश्रम. दर रविवारी या आश्रमात परिसरातील भक्त जमतात, भजन म्हणतात, प्रसाद घेतात. हे गेली १५ वर्षे सुरू आहे. पण आता या आश्रमाकडे कुणीही फिरकायला तयार नाही. आधी ६५ एकरात असलेला हा आश्रम ११ गुंठ्यावर आला आहे आणि सध्या तर आश्रमाला स्मशानकळा आली आहे. भक्त मात्र, खोदून-खोदून विचारल्यावर म्हणताहेत, सर्वोच्च न्यायालय आमच्या महाराजांना निर्दोष ठरवेल. थोडी वाट बघा!नेहमी एकमेकांना नमस्कार किंवा रामराम म्हणण्याऐवजी ‘धनधन सत्गुरू तेरा आसरा’ असं म्हणणारे भक्त, साध्वी बलात्कार प्रकरणाने सध्या हादरून गेले आहेत. शेरेवाडीजवळ तब्बल ६५ एकरात असलेल्या या आश्रमात दोनवेळा राम रहीम येऊन गेला आहे. झेड सुरक्षा व्यवस्था असलेला आणि प्रचंड ऐश्वर्यवान महाराज या दुष्काळी भागातील लोकांनी प्रथमच पाहिला होता.आश्रमात येईल त्याला आश्रमाचे हिंदी भाविक व्यवस्थापक मोठ्या मगमध्ये चहा देत. जेवण देत आणि गुरूची माहिती सांगत. आमच्या गुरूची पाठ जरी पाहिली तरी, त्याचा मनुष्यजन्म टळला, असा विश्वास ते व्यक्त करत. आश्रमाच्या परिसरात द्राक्षासह अनेक पिकेही घेण्यात येत होती. अतिशय माळरानाच्या या जमिनीत सुधारणा करण्यासाठी भक्तांनी सेवा म्हणून मोठी कामगिरी बजावली आहे. आटपाडीतील सुशिक्षित, उच्चभ्रू, उच्चवर्णीय समजल्या जाणाºया समाजातील स्त्रिया, तरूणींनाही आश्रमात सेवा करताना तालुकावासीय वर्षानुवर्षे पाहत होते.आश्रमातील भक्तांनी अनेक सामाजिक कामेही करण्याचा प्रयत्न केला आहे. २००३ च्या दुष्काळावेळी परिसरात पिण्याच्या पाण्याचा टँकर, जनावरांना चारा भक्तांनी वाटला होता. गरजूंना शैक्षणिक साहित्य वाटप केले होते. आटपाडी गावात अनेकदा स्वच्छता मोहीमही राबवली होती.‘डेरा सच्चा सौदा’चा प्रमुख राम रहीमला बलात्कार प्रकरणात न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर येथे सन्नाटा पसरला आहे. सध्या कोणताही भक्त या विषयावर काहीही बोलायला तयार नाही. मात्र विश्वासात घेतल्यावर नाव न छापण्याच्या अटीवर काहीजण आजही त्याच्यावरील विश्वास, श्रध्दा अटळ असल्याचे सांगतात. ‘आमचा आमच्या सदगुरूवर पूर्ण विश्वास आहे. त्यांनी कधीही वाईट सांगितले नाही. आमचा या गोष्टींवर विश्वास बसत नाही. नेमके तिथे काय घडले, हेच कळेना. आम्ही संभ्र्रमावस्थेत आहोत. चमत्कारावर आमचा विश्वास नाही. चमत्कार ही एक अंधश्रध्दा आहे. जगात चमत्कार घडत नसतो’, असे भक्तांचे म्हणणे आहे; मात्र ते यापुढे असाही विश्वास व्यक्त करतात की, न्यायव्यवस्थेबद्दल आम्हाला पूर्ण आदर असल्याचेही भक्त सांगत आहेत.सन्मान तर आम्ही नक्कीच करतो; पण सर्वोच्च न्यायालय आम्हाला न्याय देईल. तिथे आमचे सदगुरू निर्दोष ठरतील, असा भक्त दावा करीत असल्याचे दिसत आहे.आम्ही समाधानी, आमचे चांगलेच!या आश्रमात कधीही कोणी देणगी मागितली नाही, पावती काढली नाही. कधीही कोणाला कसला त्रास दिला नाही. आम्ही निर्व्यसनी राहिलो, समाधानी झालो, हीच आमची प्रगती, अशी भावना भक्त आजही व्यक्त करत आहेत.आश्रमावर कारवाई नाहीयेथील आश्रमात सध्या कोणीही जात नाही. गुरमित राम रहीमचे देशातील आश्रम सील केले असताना, येथील आश्रमावर अद्याप कसलीही कारवाई झालेली नाही. याबाबत कसलीही कारवाई करण्याच्या सूचना आपल्याला प्राप्त झाल्या नसल्याचे तहसीलदार सचिन लुंगटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
आटपाडीत ‘राम रहीम’च्या आश्रमाला स्मशानकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 11:59 PM