विटा : संत गाडगे महाराज ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत शौचालय व्यवस्थापनात उत्कृष्ट काम केल्याबद्दल शिरगाव (ता. कडेगाव) ग्रामपंचायतीला स्व. आबासाहेब खेडकर विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आला.
संत गाडगे महाराज ग्रामस्वच्छता अभियान २०१९-२० अंतर्गत जिल्हास्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा घेण्यात आली होती. त्यासाठी सांगली जिल्ह्यातील ६० जिल्हा परिषद मतदारसंघातील ६० ग्रामपंचायतींची तपासणी करण्यात आली होती. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तपासणी पूर्ण करून जिल्हास्तरीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
कडेगाव तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीने शौचालय व्यवस्थापनात उत्कृष्ट काम केले आहे. गावात १०० टक्के शौचालये तयार करण्यात आली असून, त्यात ९० टक्के शोषखड्डे घेण्यात आले आहेत. तसेच सार्वजनिक शौचालयांचे दोन युनिट तयार करण्यात आले आहे. सरपंच विश्वास गायगवाळे, उपसरपंच भीमराव तोडकर, ग्रामसेवक प्रशांत कोळी, सदस्य सूरज माने, वसंत यादव, उत्तम देशमुख, राजनी देवकर, रेश्मा कांबळे, जन्नत संदे यांच्यासह ग्रामस्थांनी यासाठी मोठे योगदान दिले. या कामाची दखल घेऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत शौचालय व्यवस्थापनात उत्कृष्ट काम केल्याबद्दल शिरगाव ग्रामपंचायतीला स्व. आबासाहेब खेडकर विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आला. शिरगाव ग्रामपंचायतीला जाहीर झालेल्या पुरस्काराचे स्वरूप रोख २५ हजार रुपये, मानपत्र व स्मृतिचिन्ह असे आहे.