सांगली : महापालिका क्षेत्रात वर्षानुवर्षे नोंद नसलेल्या मालमत्तांचा शोध घेण्याची मोहीम सुरू आहे. आतापर्यंत ९५ हजार घरांचा सर्व्हे करण्यात आला असून, त्यात १६ हजार ९९२ नव्या मालमत्ता आढळून आल्या आहेत. या सर्व मालमत्तांवर कराची आकारणी झाल्यास महापालिकेच्या उत्पन्नात वर्षाला १५ कोटींची भर पडणार आहे.
महापालिका क्षेत्राची झपाट्याने वाढ होत असताना घरपट्टी विभागाच्या दप्तरी मात्र कासवगतीने संख्या वाढत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मालमत्तांचा सर्व्हेच झालेला नाही. आयुक्त नितीन कापडणीस यांनी अशा मालमत्तांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. घरपट्टीसह नळ कनेक्शनधारकांचाही सर्व्हे करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. त्यानुसार घरपट्टी व पाणीपट्टी विभागाकडील कर्मचाऱ्यांकडून एकत्रित सर्व्हे हाती घेतला आहे. त्यासाठी सांगली, मिरज व कुपवाड या तीन शहरांत १४७ भाग तयार करून कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. गेल्या महिन्याभरापासून हा सर्व्हे सुरू असून, त्यातून धक्कादायक बाबी समोर येत आहेत.
महापालिका क्षेत्रात १ लाख ३८ हजार मालमत्ता आहेत. त्यापैकी ९५ हजार २८२ मालमत्तांचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. यात १६ हजार ९९२ नव्या मालमत्ता आढळून आल्या. या मालमत्तांची घरपट्टी विभागाकडे नोंदच नाही. त्यामुळे त्यांना घरपट्टी लागू झालेली नाही. त्याचा परिणाम महापालिकेच्या उत्पन्नावर पडत आहे. घरपट्टीसोबतच नळ कनेक्शनचा सर्व्हे करण्यात आला. यात ४६ हजार १९८ जणांकडे नळ जोडणी असल्याचे आढळून आले. म्हणजे जवळपास ४९ हजार मालमत्तांकडे नळ जोडणी नाही.
याबाबत कर निर्धारक व संकलक नितीन शिंदे म्हणाले की, आयुक्त कापडणीस यांच्या आदेशाने घरपट्टी व पाणीपट्टी विभागाने एकत्रित सर्व्हे हाती घेतला आहे. आतापर्यंत १७ हजार मिसिंग मालमत्ता आढळून आल्या आहेत. अजून ४२ हजार मालमत्तांचा सर्व्हे पूर्ण झालेला नाही. त्यातही मोठ्या प्रमाणात नव्या मालमत्ता मिळून येतील. या सर्व मालमत्तांची नोंद होऊन त्यांना कराची आकारणी झाल्यास महापालिकेच्या उत्पन्नात १५ कोटींची भर पडणार आहे.
चौकट
मिळून आलेल्या मालमत्ता
रहिवासी : ४६२०
वाणिज्य : १२६४
खुले भूखंड : ११,१०८
एकूण : १६,९९२
चौकट
गतवर्षी साडेचार कोटींचे उत्पन्न वाढले
गतवर्षी आयुक्त कापडणीस यांनी उपायुक्त, सहायक आयुक्तांसह विभागप्रमुखांना मालमत्तांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. खुद्द आयुक्तांनीही अनेक भागांत पाहणी केली होती. त्या सर्व्हेत जवळपास ४ हजार ७४ नव्या मालमत्ता आढळून आल्या. या मालमत्तांची नोंदणी करून त्यांना कराची आकारणी करण्यात आली. त्यातून महापालिकेचे ४ कोटी ६४ लाखांचे उत्पन्न वाढले होते.
चौकट
२० वर्षांनंतर सर्व्हे
महापालिकेच्या स्थापनेनंतर दुसऱ्यांदा मालमत्तांचा सर्व्हे होत आहे. यापूर्वी २००२ साली मालमत्तांचा सर्व्हे झाला होता, त्यानंतर गतवर्षी थोडा प्रयत्न करण्यात आला. पण, आता २० वर्षांनंतर संपूर्ण मालमत्तांचा सर्व्हे हाती घेण्यात आला.