सांगली : कोरोना काळात रोगप्रतिकारकशक्ती वाढविणाऱ्या ड्रॅगन फ्रूटला मागणी वाढली असून, आवक कमी व मागणी अधिक असल्याने आता नगाला १०० रुपये दराप्रमाणे त्याची विक्री सुरू आहे. दुसरीकडे डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याने किवी फळाचा भावही तीन किंवा चार नगाच्या बॉक्सला १५० वर गेला आहे.
ड्रॅगन फळाचा हंगाम जून ते ऑक्टोबरपर्यंत असतो. सध्या याचा हंगाम नसल्याने मागणीच्या तुलनेत आवक कमी आहे. कोरोना काळात हे फळ आरोग्यासाठी अधिक गुणकारी समजले जात आहे. त्यामुळे पौष्टिक खाद्य म्हणून या फळाला मागणी अधिक आहे. सध्या लॉकडाऊन काळात सकाळी ९ ते ११ या वेळेतच विक्री सुरू असल्याने विक्रेत्यांनी माल कमी बाळगला आहे. तरीही मागणी वाढत असल्याने दरही आता वाढत आहेत. सांगलीत या फळाची किरकोळ विक्री ९० ते १०० रुपये नग याप्रमाणे सुरू आहे.
किवी फळानेही यंदा भलताच भाव खाल्ला आहे. तीन ते चार नगाच्या छोट्या बॉक्सची किंमत आता १४० ते १५० रुपये झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वी याचे दर शंभरच्या आत होते. डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याने त्याचे भाव वाढले. अजूनही बाजारात या फळाला मागणी अधिक आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
चौकट
ड्रॅगन फळात ९० टक्के पाणी आणि भरपूर प्रमाणात ‘क’ जीवनसत्त्व असते, ’कॅल्शियम, पोटॅशियम, लोह आणि ‘बी’ जीवनसत्त्वामुळे गुणकारी, सौंदर्यवर्धक, ‘क’ जीवनसत्त्वामुळे रोगप्रतिकारकशक्तीही वाढते. त्यात बिटा कॅरोटीन असल्याने रक्तदाब, हृदयविकारात गुणकारी मानले जाते. तंतुमय असल्याने पोट साफ राहते, कॅल्शियममुळे संधिवाताच्या वेदना कमी होतात, अशा अनेक गोष्टींमुळे या फळाला मागणी आहे.
कोट
किवी व ड्रॅगन फळाचे दर वाढतच आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळीही या दोन्ही फळांचे दर वाढले होते. यंदा दुसऱ्या लाटेत दरात मोठी वाढ झाली आहे. येत्या काही दिवसांत हे दर असेच राहण्याची शक्यता आहे.
-मुसाभाई सय्यद, फळ विक्रेते, सांगली