उमरगा (जि.उस्मानाबाद) : सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील दोन अल्पवयीन मुलींना दोन तरुणांनी फूस लावून काही दिवसांपूर्वी पळविले होते. हे चौघेही उमरगा शहरात वावरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर बुधवारी उमरगा व आटपाडी पोलिसांनी शोधमोहीम राबवून या चौघांनाही ताब्यात घेतले.आटपाडी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील एका गावातील १४ व १५ वर्षीय अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या होत्या. याबाबत नातेवाइकांनी दिलेल्या तक्रारीनंतर दोन तरुणांवर गुन्हा दाखल झाला आहे. तांत्रिक माहितीच्या आधारे या दोन्ही मुली व तरुण उमरगा शहरात फिरत असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे आटपाडी ठाण्याचे कर्मचारी विकास जाधव व महेश आवळे मंगळवारी तातडीने उमरग्यात दाखल झाले.
उमरगा पोलिसांच्या मदतीने त्यांनी चौघांचाही शोध सुरू केला. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच तरुण पसार झाले. यानंतर उमरगा पोलिसांनी बुधवारी पुन्हा या चौघांचा सकाळपासूनच शोध सुरू केला. हे चौघेही उमरगा शहरातच असल्याची खात्री झाल्यानंतर कसून चौकशी करीत या पथकाने त्यांना शोधून काढले व दुपारी आटपाडी पोलिसांच्या ताब्यात दिले.मुलींना लपवले उसात, दुचाकी सोडून पळाले...उमरग्यातील शिवपुरी रोडवर ते दोन तरुण दुचाकीवरून जात असल्याचे दिसून आले. पोलिस पाठलाग करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर दुचाकी जागेवरच सोडून ते पसार झाले. पोलिसांनी ही दुचाकी ताब्यात घेतली. या काळात या तरुणांनी मुलींना शहरालगतच्या एका उसाच्या फडात लपवून ठेवले होते, अशी माहिती समोर आली आहे.