सांगली : देशभरातील अनेक गिरीशिखरे पादाक्रांत करणारे सांगलीतील अभयकुमार मोरे आता थेट एव्हरेस्टवर स्वारी करणार आहेत. एप्रिलमधील मोहिमेसाठी त्यांची नोंदणी झाली आहे. वयाच्या ५९ व्या वर्षी एव्हरेस्टवर चढाई करणारे ते देशातील सर्वांत ज्येष्ठ वयाचे गिर्यारोहक ठरणार आहेत.बॅंकेच्या सेवेतून सध्या सेवानिवृत्त झालेले मोरे सन २०१५ पासून गिर्यारोहण करत आहेत. देशातील अनेक अवघड पर्वतशिखरे सर केली आहेत. आता एव्हरेस्टची तयारी सुरू आहे. नेपाळमधील कंपनीमार्फत नोंदणी झाली आहे. मोहिमेसाठी सुमारे ३५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तो लोकसहभागातून गोळा केला जात आहे. मोरे यांनी आतापर्यंत एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर दोन वेळा मजल मारली आहे. आता अंतिम ध्येयाकडे वाटचाल सुरू होईल. त्यासाठी तीन वर्षांपासून तयारी सुरू होती. एव्हरेस्टच्या २९ हजार ३५० फुटांवर ते चढाई करतील.एव्हरेस्ट चढाईसाठी नेपाळ सरकारचे नोंदणी शुल्क ११ हजार डॉलर (सुमारे नऊ लाख रुपये) इतके आहे. त्याशिवाय ७५ हजार रुपयांचे बूट आणि सव्वालाख रुपये किमतीचा समीट ड्रेस असे अनेकविध महागडे खर्च आहेत. मोहीम ६० दिवसांची असेल.
कोल्हापूर, सांगलीत बॅंकेत सेवेदरम्यान त्यांचे गिर्यारोहण सुरूच होते. आता निवृत्तीनंतर एव्हरेस्ट सर करणार असल्याने देशातील सर्वाधिक वयाचे एव्हरेस्टवीर ठरणार आहेत. यापूर्वी हा विक्रम दिल्लीतील संगीता निधी बहल या ५५ वर्षांच्या महिलेच्या नावावर अबाधित आहे. त्यांनी २०१७ मध्ये एव्हरेस्टवर पाऊल ठेवले होते. जागतिक विक्रम जपानमधील ८० वर्षांच्या वृद्धाच्या नावावर आहे. एप्रिल-मेदरम्यानच्या मोहिमेत मोरे यांच्यासोबत पुण्यातील काही गिर्यारोहक आहेत.
एव्हरेस्टवरील चढाई शारीरिक व मानसिक क्षमतेचा कस पाहणारी असेल. त्यासाठी तीन वर्षांपासून तयारी सुरू आहे. चढाईदरम्यान शेर्पा व डॉक्टरसोबत असतील. मोहिमेसाठी नोंदणी झाली आहे.- अभयकुमार मोरे, गिर्यारोहक