घाटनांद्रे : आगळगांव (ता. कवठेमहंकाळ) येथील अभिजित शशिकांत कदम याने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) च्या प्रवेश परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. नुकताच परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये अभिजीत याने देशात १७१ वा क्रमांक मिळविला.
अभिजितचे शिक्षण हे सातारा येथील सैनिक स्कूलमध्ये झाले. तेथील शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार अभ्यास करून त्यांने या एनडीएसाठी तयारी केली. त्याला आई नीता कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. लेखी परीक्षा व एसएसबी मुलाखतीलाही तो आत्मविश्वासाने समोर गेला. महाविद्यालयीन जीवनातही शिकत असताना त्याने आदर्श एनसीसी छात्र म्हणून गौरव प्राप्त केला होता.
त्याचे वडील डाॅ. शशिकांत कदम हे पुणे येथील औषध निर्माण क॔ंपनीत वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत. त्याला सर्व शिक्षकांसह बहिण डाॅ. रेवती कदम व आजोबा सेवानिवृत्त पोस्टमास्तर विठ्ठल कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती दत्ताजीराव पाटील व जिल्हा परिषद सदस्य आशाराणी पाटील यांनी त्याचे अभिनंदन केले.