सांगली : ‘नवभारत’ संस्थेच्यावतीने देण्यात येणारा यावर्षीचा ‘युथ लिडर इन हेल्थ केअर’ पुरस्कार काँग्रेसचे नगरसेवक अभिजित भोसले यांना जाहीर झाला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते शनिवारी राज्यभवनात पुरस्कार वितरण सोहळा होणार असून, आरोग्यमंत्री राजेश टोपे व मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख उपस्थित राहणार आहेत.
अभिजित भोसले यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. गेली वर्षभर कोरोना महामारीत भोसले यांनी रुग्णांसह नातेवाईकांना मदतीचा हात दिला आहे. कोरोना लाटेत मोफत अन्नदान, फिरता दवाखाना, होम आयसोलेशनमधील रुग्णांना मदत, ऑक्सिजन व्हेंटिलेटर बेडसाठी मदत करण्यासाठी धावपळ केली. तसेच ६० बेडचे कोविड सेंटरही सुरू केले. लहान मुलांसाठी राज्यातील पहिले कोविड सेंटर सुरू केले आहे.
भोसले म्हणाले, कोरोना काळात जे काम केले, त्यासाठी मला मित्रांची साथ मिळाली. अनेक दानशूर व्यक्तींनी मदत केली. महापालिकेच्या डॉक्टर, नर्सेस इतर कर्मचार्यांनी चांगले सहकार्य केले. राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी प्रोत्साहन दिल्यानेच लढायला बळ मिळाले. भविष्यातही चांगले काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.