सांगली : सांगली जिल्ह्यामध्ये द्राक्ष व बेदाणाचे चांगले उत्पादन असून या उत्पादनांचा जागतीक स्तरावर गुणवत्तापुर्ण व दजेर्दार पुरवठा करुन लौकिक अधिकाधिक वाढविण्याच्या दृष्टीने अपेडा, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व जिल्हा प्रशासन अधिकाधिक पुढाकार घेईल. उत्पादक, शेतकरी, निर्यातदार यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याच्या दृष्टीने अधिकाधिक प्रयत्न करण्यात येतील असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
निर्यातक्षम कृषी उत्पादनाच्या गुणवत्तापुर्ण वाढीच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, अपेडाचे मुंबई आणि प्रादेशिक प्रमुख आर. रविंद्र, कृषी पणन मंडळाच्या कोल्हापूर विभागाचे उपव्यवस्थापक एस. एस. घुले, कृषी पणन मंडळाच्या निर्यात विभागाचे सतीश वराडे, जिल्हा उद्योग व्यवस्थापक नितीन कोळेकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, निर्यातदार अशोक बाफना, किशन लोचन यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी, निर्यातदार व उत्पादक उपस्थित होते.
केंद्र सरकारने डिसेंबर 2018 नविन कृषी निर्यात धोरण जाहीर केले आहे. देशातील कृषी उत्पादनांच्या नियार्तीकरिता पहिल्यांदाच असे धोरण निर्माण केले आहे. महाराष्ट्र राज्यात याच धर्तीवर कृषी निर्यात धोरण तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. महाराष्ट्र राज्यात कृषी निर्यात धोरण राबविण्याकरिता महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाची केंद्र सरकार मार्फत नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्याकरिता केंद्र सरकारने सहा क्लस्टर घोषित केले होते. तथापि, राज्यातील विविध उत्पादनांचा आवाका लक्षात घेता राज्यात 21 क्लस्टर प्रस्तावित करण्यात आले आहेत. द्राक्ष व बेदाणा यांच्या क्लस्टरमध्ये सांगली जिल्ह्याचा समावेश आहे.
सदर क्लस्टर मध्ये निर्यातवृध्दीच्या अनुषंगाने काय काय उपाययोजना करता येवू शकतील यासाठी अपेडा, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, जिल्हा प्रशासन, निर्यातदार, उत्पादक यांच्या बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले.
कोणत्याही बाजारपेठेत विक्री होणारी जिल्ह्यातील द्राक्ष व बेदाणा आदी उत्पादने गुणवत्तापुर्ण व दजेर्दार असावित यासाठी यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासन मदत करेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.महाराष्ट्रामध्ये डाळिंबासाठी सोलापूर, अहमदनगर आणि पुणे जिल्हे, संत्र्यासाठी नागपूर, आमरावती, वर्धा जिल्हे, केळीसाठी जळगाव, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्हे, अंब्यासाठी रत्नगिरी, सिंधुदुर्ग, द्राक्षांसाठी पुणे, नाशिक, सांगली जिल्हे तर कांद्यासाठी नाशिक जिल्हा या क्लस्टरवर अधिकाधिक लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. या क्लस्टर मधून सदरची उत्पादने जागतीकस्तरावर निर्यात होतात.
द्राक्ष, बेदाणा ही उत्पादने सांगली जिल्ह्याचा महत्वाचे घटक आहेत. बेदाणेला देशातंर्गत मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. येत्या काळात जागतीकस्तरावर बेदाणा मोठ्या प्रमणावर निर्यात करण्यासाठी कोणती गुणवत्ता आवश्यक आहे, भारतीय बेदणाचा जागतीकस्तरावर ब्रँड व्हावा, यासाठी उत्पादकांनी अभ्यास करुन जागतीक परिमाणांची पुर्तता करणारी उत्पादने घेणे आवश्यक आहे. यावर या बैठकीत चर्चा झाली.
यावेळी बेदाण्याची ब्रँड व्ह्यल्यु वाढविण्यासाठी अपेडा मदत करेल, उत्पादक, पुरवठादार आणि निर्यातदार यांनी एकत्रित येवून प्रयत्न करावेत यासाठी अपेडा सवोर्तोपरी मदत करेल असे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी बेदाणा क्लस्टर जिल्ह्यात विकसित झाल्या गुणवत्तापुर्ण उत्पादनांची निर्मिती होऊन ब्रँडतयार होईल यावर या बैठकीत चर्चा झाली. अपेडामार्फत निर्यातदारांना पायाभूत सुविधा, गुणवत्ता, बाजारपेठ आणि सेंद्रीय उत्पादनांच्या विकासासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले.